बनावट औषध रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड
मुख्य सूत्रधारासह तिघांना पश्चिम आशियातील विमानतळावरून अटक : सीमाशुल्क अधिकाऱ्यांची कारवाई
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकासह देशातील विविध भागांत पसरलेल्या बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सीमाशुल्क अधिकाऱ्यांना यश आले आहे. रॅकेटचा मुख्य सूत्रधार नागरभावीचा प्रशांत आणि त्याच्या दोन साथीदारांना पश्चिम आशियातील एका देशाच्या विमानतळावर अटक करण्यात आली आहे. यावरून या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचे तपासातून उघड झाले आहे.
तस्करी टोळीचा सूत्रधार प्रशांत आणि त्याच्या दोन साथीदारांना विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी पकडल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. या पश्चिम आशियाई देशात कर्करोगासह गंभीर आजारांवरील औषधे अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहेत. याच पार्श्वभूमीवर कोट्यावधी ऊपयांची औषधे भारतात आणून बेकायदेशीरपणे तस्करी करण्याचा कट प्रशांतने आपल्या दोन साथीदारांमार्फत रचला होता, असे चौकशीदरम्यान असे उघड झाले आहे.
विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावरील औषधे निर्यातीवर संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता तेव्हा हा अवैध प्रकार उघडकीस आला. चौकशीदरम्यान, साथीदारांनी सूत्रधार प्रशांतचे नाव सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यालाही तात्काळ अटक केली. पोलीस चौकशीदरम्यान प्रशांतच्या पत्नीने ही महत्त्वाची माहिती उघड केली.
काही दिवसांपूर्वी अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी तावरेकेरे येथील सी. के. तांडा येथील फार्महाऊसवर छापा टाकला असता तेव्हा औषधांची पुनर्रपॅकेजिंग करणारे एक अवैध केंद्र उघडकीस आले होते. चेन्नई, हरियाणा, चंदीगड आणि परदेशातून कमी किमतीत आयात केलेली औषधे येथे नामांकित कंपन्यांच्या बनावट लेबल्स आणि महागड्या दरांच्या टॅगसह बाजारभावाच्या चौपट दराने विकली जात होती. पोलिसांनी त्याच्या लपण्याच्या जागेवर छापा टाकण्यापूर्वीच प्रशांत 8 ऑगस्ट रोजी परदेशात फरार झाला होता.
बनावट औषधांच्या डेपोवर छापा पडल्याचे कळताच प्रशांतने त्याचा व्यावसायिक भागीदार व्यंकटेशला परदेशात आणण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते. परंतु पोलिसांनी विशिष्ट माहिती मिळवून व्यंकटेश विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच त्याला हेब्बाळजवळ अटक करून त्याची चौकशी केली. तपास अधिकारी प्रशांतच्या कोठडीची तपासणी करत असून पोलीस सहआयुक्त वामशी कृष्णा यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला भारतात आणण्यासाठी इंटरपोलमार्फत प्रक्रिया जलद केली आहे.
चौघांना अटक
19 ऑगस्ट रोजी तावरेकेरे सी. के. तांडा येथे छापा टाकून कोट्यावधी रुपयांची बनावट औषधे जप्त केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चार जणांना अटक करण्यात आली होती. आरोपी गेल्या वर्षभरापासून बनावट औषधांचा व्यवसाय चालवत होते. ते कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय औषधे गोळा करून त्यांवरील लेबले बदलून त्यावर जास्त किमतीची लेबले लावत होते.
घटनास्थळीच औषधांची निर्मिती
काही औषधे घटनास्थळीच तयार केली जात होती. या संदर्भात मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, अन्न सुरक्षा आणि औषध नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह छापा टाकण्यात आला. दरम्यान, आरोपी बेंगळूरसह विविध ठिकाणी बनावट औषधे विकून नफा कमावत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आरोपींविऊद्ध बीएनएस कलम 276 (औषधांमध्ये भेसळ), 51 (कृत्यास मदत करणे) आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.