पतधोरण बैठकीमधून व्याजदर कपातीची शक्यता
पतधोरण बैठकीला प्रारंभ : 4 ते 6 फेब्रुवारीपर्यंत बैठक राहणार
नवी दिल्ली :
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ची चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) ची बैठक 4 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ही बैठक 6 फेब्रुवारीपर्यंत चालेल आणि 6 फेब्रुवारी रोजी रेपो दराबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. तज्ञांच्या मते, या बैठकीत व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करून 5.25 टक्के करण्यात आला होता. या वर्षी 4 वेळा रेपो दरात 1.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत आरबीआयने रेपोदर 6.5 टक्केवरून 6.25 टक्के पर्यंत कमी केला होता. चलनविषयक धोरण समितीने सुमारे 5 वर्षांनी ही कपात केली. एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत दुसऱ्यांदा व्याजदरातही 0.25 टक्क्यांनी कपात केली होती.
जूनमध्ये तिसऱ्यांदा व्याजदरात 0.50 टक्के कपात करण्यात आली. त्यानंतर डिसेंबरमध्ये 0.25 टक्के कपात करण्यात आली. म्हणजेच, चलनविषयक धोरण समितीने 4 वेळा व्याजदर 1.25 टक्के कमी केले आहेत.