महाराष्ट्र हित
दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापुर, बेळगांव, मिरज येथील आकर्षण ठरलेल्या मानाच्या, परंपरेच्या आणि प्रेक्षणीय मिरवणूका दीर्घ काळ मोरया मोरया करत विसावल्या आहेत. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपुरक, आनंददायी आणि लोककल्याणकारी करणेत सर्वांचेच मोठे योगदान दिसले. अजूनही काही चांगले उपक्रम, सुधारणा करता येतील पण हा उत्सव आहे तो उत्साही असणारच नव्हे असलाच पाहिजे. यंदा गणेशोत्सवापूर्वी राजकीय, सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेचे वातावरण चिंतेचे होते. काही जण पोटात भीतीचा गोळा उठावा अशी विधाने करत होते. पण महाराष्ट्र महान राष्ट्र आहे येथे संताची शिकवण आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श आहे त्यामुळे हा उत्सव अतिशय आनंददायी, कोणतीही अनुचित दुर्घटना न होता पार पडला, याचा सर्वांना आनंद आहे. दहा दिवस डोळ्यात तेल घालून पहारा देणारे पोलिस आणि मंडळाचे कार्यकर्ते यांचे करावे तेव्हढे कौतुक कमी आहे. गणपती ही कलेची, बुद्धीची देवता आहे. अगदी दहा वीस वर्षांपूर्वी गणेशोत्सव काळात विविध स्पर्धा, व्याख्यानमाला, मान्यवरांच्या मुलाखती, गायकांच्या मैफली, विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम यांची रेलचेल असे. अलीकडे महाप्रसाद आणि सेलिब्रिटीकडून दर्शन याला फारच महत्त्व आले आहे. महाप्रसाद हवाच पण कार्यकर्ता आणि समाज संस्कार घडवणाऱ्या या सोहळ्याला कला, विद्या, ज्ञान, संस्कार असे स्वरूप दिले गेले पाहिजे. अलीकडे शालेय गणेशोत्सव बंद झाला आहे. पण गावातील सुज्ञ मंडळीनी गणेशोत्सव काळात दोन दिवस शाळकरी मुलांसाठी ठेवून काही खास उपक्रम राबवता येतील का? याचा विचार आणि कृती केली पाहिजे. महाराष्ट्रात गणेशोत्सव धुम धाम आणि वाजत गाजत मोरयाचा गजर करत पूर्ण झाला आहे. यावेळी देशात इतरत्र गणेशोत्सवासोबत केंद्रातील मोदी-3 सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाल्याने जोरजोराने ढोल वाजवले जाताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपा एनडीए आघाडीचा 400 पारचा नारा होता आणि मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतली की पहिल्या शंभर दिवसांत काय काय करायचे, कोणते निर्णय घ्यायचे, नवीन सुधारणांसाठी पावले कशी टाकायची या संदर्भात एक टास्क फोर्स तयार केला होता. मोदी 1 आणि मोदी 2 काळात शपथविधी नंतर झपाटा सुरू झाला होता
पण मोदी 3 काळात तसा तो जाणवत नाही. मोदी सरकारने आपल्या दहा वर्षात अनेक आर्थिक सुधारणा केल्या, नोटाबंदी, कॅशलेस व्यवहार, राम मंदिर, घटनेचे 365 वे कलम रद्द ,तीन तलाख वगैरे वगैरे निर्णय घेतले. सरकारने रस्ते, विमानतळे, रेल्वे, स्मार्ट सिटीज, नवे शैक्षणिक धोरण, भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी ठोस उपाय वगैरे पावले उचलली. मोदी 3 सत्तारुढ होताच समान नागरी कायदा, भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था, ग्रीन एनर्जीत मुलभूत काम, अन्नदाता शेतकरी इंधनदाता करणेसाठी बुस्ट, रेल्वे सुधारणा, शेती सुधारणा, रोजगार निर्मिती आदीवर भर देईल अशी अपेक्षा होती. पण भाजपाला निवडणुकीत अपेक्षित यश आले नाही. त्यांना लोकसभेत गेल्यावेळी तीनशे पार असे जे स्वबळ होते ते उरले नाही. नवीन मित्र शोधून सत्ता स्थापन करावी लागली. ओघानेच उत्साह कमी झाला आणि मित्रांच्या तालावर कामाला मर्यादा आल्या. मोदींनी पायाभूत कामांना निधी व मंजूरी दिली आहे. महाराष्ट्रात वाढवण बंदर हा मोठा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. वाढवण बंदर हे जगातील अत्याधुनिक आणि पहिल्या पाच क्रमांकातील बंदर म्हणून साकारले जाणार आहे. ओघानेच महाराष्ट्रातील अनेक उद्योग व्यवसायांना सुसंधी मिळणार आहे. विकासाचे प्रकल्प हाणून पाडण्यावर काहींचा राजकीय कटाक्ष असतो. पण हे चालणारच. तूर्त शंभर दिवसांच्या यादीत समाविष्ट अनेक गोष्टी मार्गी लावल्या जात आहेत. मोदीनी गुजरातमध्ये घेतलेल्या परिषदेत सौर ऊर्जा आणि त्यासाठीचे मोठे टार्गेट सांगत गुंतवणूकदारांना मोठं भांडवल घाला, विदेशी गुंतवणूक आणा असे अवाहन केले आहे. रिलायन्स उद्योग समुहाने आपल्या वार्षिक सभेत या क्षेत्रात मोठ्या गुंतवणूकीची घोषणा केली आहे. टोरॅटो उद्योगसमुहाने दमदार पाऊल टाकले आहे. अदानी, टाटा, सुझलॉन वगैरे उद्योग तयारीत आहेत. एकुणच पुढील दहा वर्षांत ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल होतील असे दिसते आहे. शेअरबाजारही या सर्वावर लक्ष्य ठेऊन प्रतिसात देत आहे. मोदीना मित्र पक्ष कशी साथ देतात आणि महाराष्ट्र, झारखंड, काश्मीर येथे मतदार कुणाला कौल देतात यावर या सरकारचे भवितव्य लिहिले जाणार आहेत. कलम 370 रद्द झाल्यावर काश्मीरमध्ये होत असलेल्या निवडणुका व बुधवारी पहिल्या टप्प्यात झालेले मतदान लोकशाही दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. मतदान उत्साहात आणि शांततेत पार पडले अशी वार्ता आहे. दहशतवाद मोडून काढून लोकशाही व लोकनियुक्त सरकार काश्मीरला देण्यात एक महत्वपूर्ण पाऊल पडले आहे. दुसरा टप्पा कसा पार पडतो, लोक कुणाला कौल देतात ही उत्सुकता राहीलच पण जम्मू काश्मीर हे भारताचे अंग आहे हे अधोरेखित होईल. महाराष्ट्रात अजून खरा खेळ सुरु झाला नाही.
मुख्यमंत्री पदाच्या नावात आणि काही इच्छुकांची भर पडते आहे. आता सौ. रश्मी ठाकरे यांचेही नाव पुढे आले आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला नाही तर शिवसेना ठाकरे गट वेगळा निर्णय घेणार असे सांगितले जाते आहे. जरांगेनी मराठा आरक्षण प्रकरणी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. महाराष्ट्रात युती आणि आघाडी दोन्ही तंबूत जागावाटप बोलणी अंतीम टप्प्यात आली आहेत, काहींना कानात कामाला लागा अशा सूचना सांगण्यात आल्या आहेत.
पक्षपंधरवडा हा बैठका व वेगवेगळ्या गोष्टी शिजवण्यासाठी वापरला जाईल. भाजपा मोठा खेळ खेळणार असं सांगितलं जात आहे. इनकमिंग आणि व्यवस्था अनुकुल करणेसाठी यंत्रणा कार्यरत झाली असं म्हटलं जातय. राजकारणात काहीही होऊ शकते असे दिवस आहेत. तूर्त विघ्नहर्ता उत्सव आणि विसर्जन मिरवणूका शांततेने पार पडल्या. काश्मीरमध्ये उत्साही मतदान सुरु आहे आणि महाराष्ट्रात जागावाटप आणि फोडाफोडीचे राजकारण गती घेते आहे. महाराष्ट्राला स्थिर, भक्कम व चांगले सरकार मिळेल का असे लोक विचारत आहेत पण त्यांचे उत्तर लोकांच्या हातीच आहे. ते कोणाला निवडून देतात यावरच त्यांचे व महाराष्ट्राचे हित आहे.