निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : स्विमर्स व अक्वेरिअर्स जलतरण क्लब आयोजित 20 व्या निमंत्रितांच्या वयोमर्यादित आंतरराज्य स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सदर स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटका येथील जवळपास 450 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केएलई विद्यापीठाचे उपकुलगुरू नितीन गानगे, डॉ. एम. व्ही. जाली, पुरस्कर्ते प्रवीण पाटील, राम मल्ल्या, बी. सी. वैध, जयवंत हमण्णवर, सतीशकुमार, जी. एस. बेलकेरी, उमेश कलघटगी, सुधीर कुसाने, इंद्रजीत हलगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. 118 प्रकारात स्पर्धा घेण्यात आली. 35 व 50 वर्षांवरील स्पर्धेकांनी सुद्धा वयस्कर गटात सहभाग घेतला. त्याचप्रमाणे पती-पत्नी हा नवीन प्रकार सुरू करण्यात आला. यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. सदर स्पर्धेसाठी 1 लाख 50 हजारची रोख बक्षिसे, पदके, प्रमाणपत्र व चषक विजेत्या स्पर्धकांनी देण्यात येणार आहे. निमंत्रित खेळाडूंसाठी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे.