आंतरराज्य टोळीच्या आवळल्या मुसक्या
कागवाड पोलिसांकडून पाच जणांना अटक : 26 लाखांचे दागिने जप्त
बेळगाव : बसमध्ये प्रवासी महिलेचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीतील पाच जणांना कागवाड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून तब्बल 26 लाख रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी सोमवारी पत्रकारांना यासंबंधीची माहिती दिली आहे. सोमवारी पोलीस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुनवळ्ळी, गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक आदी अधिकारी उपस्थित होते. आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी उत्तरप्रदेशमधील असून या टोळीत एका महिलेचाही समावेश आहे. मिरजपासून विजापूरपर्यंत बसमध्ये फिरत असताना त्यांनी दागिने पळविले असून या टोळीने एकूण सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
जॉकी ऊर्फ जकीरअहमद उमरदराज (वय 65) राहणार दोहली, ता. चांदपूर, जि. बुलंद शहर, अफसाना इर्शाद (वय 51) राहणार हातम्माबाद, जि. बुलंद शहर, मोबीनखान खलील खान (वय 31) राहणार कुचेजा, ता. जि. बुलंद शहर, इंद्रजित लालसिंग (वय 48) राहणार धमोडानारा, ता. सिकंदराबाद, जि. बुलंद शहर, महम्मदयुसुफ इस्लामुद्दीन (वय 56) राहणार फैसलाबाद, जि. बुलंद शहर अशी त्यांची नावे आहेत. चन्नव्वा रामू बहुरुपी, राहणार संकोनट्टी, ता. अथणी ही महिला दि. 18 जानेवारी 2026 रोजी मंगसुळी बसस्थानकावर असताना दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास तिच्या गळ्यातील 12 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र अज्ञातांनी पळविले होते. दुसऱ्या दिवशी 19 जानेवारी रोजी कागवाड पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला होता.
अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुनवळ्ळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर, कागवाडचे पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र खोत, आर. पी. काटेकरी, एस. पी. मुगन्नावर, एम. एम. जंबगी, एस. एस. नंदीवाले, एस. डी. देवऋषी, ए. जे. जायगोने, एम. एस. ककमरी, तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कन्नावर आदींचा समावेश असलेल्या पथकाने या आंतरराज्य गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीसप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीने एकूण सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. कागवाड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 4, अथणी व चिकोडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी 1 असे सहा गुन्हे केले आहेत. त्यांच्याजवळून 25 लाख 80 हजार रुपये किमतीचे 172 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
टोळीची कार्यपद्धत
सोबत मोठी बॅग घेऊन या टोळीतील गुन्हेगार बसमध्ये चढतात किंवा एखाद्या बसस्थानक परिसरात उभे राहतात. त्या बॅगमध्ये ब्लाऊसपीस किंवा बांगड्या असतात. जर पोलिसांच्या तावडीत सापडले तर आपण कापड व्यापारी आहोत, असे ते सांगत असतात. मिरजेतून कागवाड, अथणी, जमखंडी मार्गे विजापूरला जाणाऱ्या बसमध्ये चढल्यानंतर एखाद्या गावाजवळ प्रवासी महिलांच्या गळ्यातील दागिने पळविल्यानंतर ते तेथेच उतरतात. तेथून दुसऱ्या बसमध्ये चढतात, अशी त्यांची कार्यपद्धत आहे.