दिल्लीत आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
78 लाख रुपयांच्या गांजासह दोन तस्करांना अटक : महाराष्ट्राशी कनेक्शन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीत पोलिसांनी एका आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत दोन तस्करांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 156 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 78 लाख रुपये इतकी आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या रॅकेटचे महाराष्ट्राशी कनेक्शन असल्याचेही चौकशीअंती स्पष्ट झाले आहे.
दिल्लीतील राजा गार्डन उ•ाणपुलाजवळ सापळा रचत विजय सिंग (43) नावाच्या एका व्यक्तीला त्याच्या एसयूव्ही कारसह थांबवण्यात आले. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यात गांजाने भरलेल्या 75 प्लास्टिक पिशव्या आढळल्या. चौकशीदरम्यान विजय सिंगने आपण विनीत नावाच्या एका मोठ्या ड्रग्ज तस्करासाठी काम करतो असे सांगत हा गांजा नागपूरहून आणल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या अन्य एका साथीदारालाही अटक करण्यात आली.