For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यातील पावसाची तीव्रता किंचित कमी

06:05 AM Jul 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यातील पावसाची तीव्रता किंचित कमी
Advertisement

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पाऊस

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

पुणे

Advertisement

शनिवारी राज्याच्या अनेक भागात पावसाने उसंत घेतली. तसेच दिवसभरात सूर्यनारायणाचे दर्शन झाल्याने दिलासा मिळाला. दरम्यान, रविवारी कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे.

उत्तरपश्चिम बंगालचा उपसागर तसेच दक्षिणपश्चिम राजस्थानच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, याच्या प्रभावामुळे ओरिसा राज्यात 28 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान,राज्यातील पावसाची तीव्रता शनिवारी किंचित कमी होती. पावसाने ब्रेक घेतल्याने तसेच सूर्यनारायणाचे दर्शन झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दिवसभर अधूनमधून पावसाची एखाद दुसरी सर येत असल्याने वातावरण आल्हाददायक झाले. राज्याच्या बहुतांश भागात अशी स्थिती होती. यामुळे अनेक धरणांतून होणारा विसर्गही बंद करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या चार दिवसातील पावसाच्या स्थितीमुळे राज्याच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे.

 कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस

बंगालचा उपसागर तसेच राजस्थानवर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याकडे बाष्पयुक्त वारे येत आहेत. रविवारी रायगड, रत्नागिरी, सातारा घाट परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर पुणे घाट भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर राज्याच्या अनेक भागातील पाऊस हळूहळू कमी होणार आहे.

 राज्यातील धरणांत 56 टक्के पाणीसाठा

जून महिना कोरडा गेल्यानंतर राज्यातील धरणांमध्ये जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने राज्याचा पाणीसाठा 56 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात जून महिन्यात पाणीसाठा निम्याहूनही कमी होता. मात्र, जुलै महिन्यात राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस झाला. विशेषत: 6 ते 9 जुलै तसेच 20 ते 25 जुलै या कालावधीत अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे संबंधित धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, राज्यभर पावसाचे  वितरण अद्याप असमान असल्याने काही भागांमध्ये जलस्थिती अद्याप अपेक्षित पातळीपर्यंत पोचलेली नाही. त्यासाठी उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व काटेकोर व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :

.