For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

फ्रान्समध्ये पुन्हा आगडोंब तीव्र

06:58 AM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्समध्ये पुन्हा आगडोंब तीव्र
Advertisement

हिंसाचार रोखण्यासाठी 70,000 सुरक्षा कर्मचारी तैनात : आंदोलनामुळे फुटबॉल सामना पुढे ढकलला

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

फ्रान्समध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर देशभरात शनिवारी पुन्हा महागाईविरोधातील आंदोलने पुन्हा तीव्र झाली. भडकलेल्या आगडोबानंतर हिंसाचार आणि लूटमार रोखण्यासाठी देशभरात सुमारे 70,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विशेष पोलीस पथके, सुमारे 20 चिलखती वाहने आणि 15 पाण्याचे फवारे मारणारी वाहने देखील तैनात करण्यात आली आहेत. गेल्या शनिवारी 5 लाखांहून अधिक लोक निषेधासाठी रस्त्यावर उतरले होते. आंदोलनादरम्यान दुकानांची तोडफोड, लूटमार आणि वाहने जाळल्याने तणाव वाढला आहे. या आंदोलनप्रकरणी आतापर्यंत 2,700 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

देशातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. पॅरिसमधील लूव्र संग्रहालय बंद ठेवण्यात आले आहे. तसेच पॅरिस सेंट-जर्मेन आणि ल्योन यांच्यातील फुटबॉल सामनाही पुढे ढकलण्यात आला आहे. शाळांच्या दयनीय स्थितीवरून सुरू झालेले हे आंदोलन आता महागाई, वाढता खर्च आणि सरकारी सेवांमधील कपातीविरोधातील निषेधापर्यंत चिघळला आहे.

मॅक्रॉन यांची विद्यार्थी संघटनांशी चर्चा

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेतली. महिनाभरापूर्वी शाळांच्या स्थितीवरून आंदोलन सुरू झाल्यापासून विद्यार्थी संघटनांसोबतची ही त्यांची पहिली थेट भेट होती. शनिवार-रविवारी फक्त कामगार संघटनांच्या निदर्शनांना परवानगी दिली जाईल, असे मॅक्रॉन यांनी म्हटल्यामुळे विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या आहेत. फ्रान्समधील प्रमुख विद्यार्थी संघटना असलेल्या ‘यूएनईएफ’ने शनिवारी एका रॅलीची घोषणा केली. मॅक्रॉन लोकांचा निषेध करण्याचा हक्क काढून घेत आहेत, असे या संघटनेने म्हटले आहे. बंदी असूनही रॅली आयोजित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे प्रशासकीय पातळीवर चर्चेसाठी हालचाली गतिमान करण्यात आल्या होत्या.

अनेक शहरांमध्ये संचारबंदी

हिंसाचार टाळण्यासाठी पॅरिसमधील रात्रीची संचारबंदी सोमवारपर्यंत वाढवण्यात आली आहे. मार्सेल आणि ल्योनमध्ये लोकांना गटा-गटाने फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. बोर्डो, नीस आणि उत्तर फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काही भागांमध्ये, मुलांना आणि किशोरवयीन मुलांना रात्री बाहेर जाण्यास मनाई आहे. पॅरिसमध्ये, प्लेस दे ला रिपब्लिक आणि ले हालेस यांसारख्या भागांमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत निर्बंध लागू असतील.

3,000 हून अधिक दुकानांचे नुकसान

सरकारी अंदाजानुसार, गेल्या आठवड्याच्या अखेरीस फ्रान्समध्ये किमान 3,000 दुकानांचे नुकसान झाले. आंदोलकांनी अनेक दुकाने लुटली आहेत. व्यावसायिक संघटनांच्या मते, हे नुकसान लाखो डॉलर्सचे आहे. पॅरिसमध्ये सुपरमार्केट, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, बँका आणि उच्च-श्रेणीच्या ब्रँडच्या शोरूमना लक्ष्य करण्यात आले. बोर्डोमध्येही अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली. दंगलखोरांनी वाहने पेटवली, रस्ते अडवले आणि बस थांब्यांसारख्या सार्वजनिक सुविधांचे नुकसान केले. मध्य फ्रान्समधील लिमोज शहरातील 19व्या शतकातील ऐतिहासिक टाऊन हॉलचेही नुकसान झाले.

Advertisement
Tags :

.