‘इंटेल’ भारतातच बनवणार लॅपटॉप, केली 8 कंपन्यांशी भागीदारी
मेक इन इंडियाअंतर्गत करणार कामागिरी : तांत्रिक, कार्यप्रणालीबाबत कंपन्यांचे घेणार साहाय्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक पातळीवर सेमी कंडक्टरची निर्मिती करणाऱ्या इंटेल या कंपनीने भारतातच लॅपटॉप बनवण्याचा निर्धार केला असून याअंतर्गत भारतातल्या 8 कंपन्यांबरोबर भागीदारी करण्याची घोषणा केली आहे.
भारतातल्या 8 इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती सेवा कंपन्या आणि मूळ डिझाईन निर्मात्यांसोबत इंटेल ही कंपनी भागीदारी करणार असून यांच्या सहकार्याने भारतामध्येच मेक इन इंडिया अंतर्गत लॅपटॉपची निर्मिती करणार असल्याचे सांगितले जात आहे. तांत्रिक आणि कार्यप्रणाली संदर्भातील सहकार्यासाठी इंटेल ही कंपनी भागीदारी करण्यात आलेल्या कंपन्यांची मदत घेणार आहे. डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया, ऑप्टीमस इलेक्ट्रॉनिक्स, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया, भगवती प्रोडक्टस, पेनाचे डीजी लाईफ, स्माईल इलेक्ट्रॉनिक्स, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी आणि व्हीव्हीडीयन टेक्नॉलॉजी या कंपन्यांसोबत कंपनीने भागीदारी केली आहे. सदरच्या 8 कंपन्यांनी सरकारकडे उत्पादन प्रोत्साहन सवलतीसाठी म्हणजेच पीएलआय योजनेकरिता अर्ज केला आहे.
इंटेलच्या अत्याधुनिक अशा सरफेस माऊंट टेक्नॉलॉजीचा वापर लॅपटॉप निर्मितीसाठी केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. उत्पादन प्रक्रिया एकदा स्थापित झाल्यानंतर कंपनी देशांतर्गत पातळीवर व जागतिक पातळीवर आपल्या उत्पादनांना कंपनी पाठवू शकणार आहे.
काय म्हणाले एमडी
इंटेल कंपनीचे भारतातील उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष विश्वनाथन यांनी भारतातील मेक इन इंडिया अंतर्गत लॅपटॉप निर्मितीसाठी उचलण्यात येणाऱ्या पावलासंदर्भात आम्ही उत्साही आहोत. आवश्यक ती पावले उचलून दर्जेदार उत्पादनांच्या सादरीकरणातून कंपनी भारतामध्ये विकसित होण्यासाठी आगामी काळामध्ये प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.