विम्याचा हप्ता स्वस्त होणार, शून्य जीएसटीचा परिणाम
सरकारच्या पावलामुळे विमा ग्राहकांची संख्या वाढणार : विमा कंपन्या नवा हप्ता रचनेच्या तयारीत
वृत्तसंस्था/ मुंबई
केंद्र सरकारने अलीकडेच नव्याने सुधारित जीएसटी दराची घोषणा केली असून त्याचा फायदा सर्वच क्षेत्रांना होणार आहे. आगामी काळात विमा क्षेत्रातील कंपन्यांनाही याचा फायदा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 18 टक्के इतका जीएसटी रद्द केला आहे.
18 टक्के होता कर
केंद्र सरकारने विमा प्रीमियमवर शून्य टक्के जीएसटी केल्यामुळे विमा घेणाऱ्या ग्राहकांना वार्षिक स्तरावरती चांगली बचत अनुभवता येणार आहे. 56 व्या वस्तू व सेवा कर परिषदेच्या बैठकीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विमा व्यवसायावर शून्य टक्के जीएसटी घोषित केल्याने विमा हप्त्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. याआधी विमा प्रीमियमवरती साधारण 18 टक्के इतका जीएसटी आकारला जात होता. तो आता शून्य टक्के करण्यात आला आहे.
किती होणार बचत
जीएसटी शुल्क आता शून्य करण्यात आल्याने येणाऱ्या काळात वर्षाला 15000 रुपयांचा विमा प्रीमियम भरणाऱ्यांना साधारणपणे 2700 रुपये इतकी बचत करता येणार आहे. म्हणजेच यापुढे म्हणजेच दहा वर्षासाठी प्रीमियम भरायचा झाल्यास जवळपास 27 हजार रुपये विमाधारकाचे वाचणार आहेत. ही तशी पहायला गेल्यास मोठी रक्कम म्हणता येईल. विमा प्रीमियमची रक्कम कमी झाल्यामुळे येणाऱ्या काळात जास्तीत जास्त ग्राहक विमा घेण्याकडे आकर्षित होतील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. विमा कंपन्या आता नव्या हप्ता रचनेच्या तयारीत गुंतले आहेत.