वाहन चालकांना 5 लाखांचा विमा कवच
लाभ घेण्याचे आवाहन : कर्नाटक राज्य मोटार वाहतूक-कल्याण विकास मंडळाची योजना
बेळगाव : खासगी व्यावसायिक वाहन चालकांना कर्नाटक मोटार वाहतूक आणि कामगार सामाजिक सुरक्षा व कल्याण विकास मंडळातर्फे विमा योजना राबविण्यात आली आहे. याअंतर्गत वाहन चालविताना अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्यास त्याला 5 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. नुकताच कणबर्गी येथील ज्ञानेश्वर गोवेकर या मृत्युमुखी पडलेल्या वाहनचालकाच्या कुटुंबीयांना या विमातंर्गत निधी मिळाला आहे. यासाठी बस, रिक्षा, मालवाहू टेम्पो, मॅक्सीकॅब आदी वाहन चालकांनीही विमा योजना करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
खासगी व्यावसायिक वाहनचालक अधिकारी त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ही कल्याणकारी योजना राबविण्यात आली आहे. संबंधित खासगी वाहनचालकांनी मजगाव येथील कामगार खात्याच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावेत, आधार कार्ड, बँक पासबुक, पॅनकार्ड, रेशनकार्ड आणि छायाचित्र आवश्यक आहे.
खासगी वाहनचालकांना सुरक्षितता देण्याच्या दृष्टिकोनातून ही विमा योजना राबविण्यात आली आहे. जिल्ह्यात खासगी वाहन चालकांची संख्या मोठी आहे. या वाहन चालकांना या विम्याचा लाभ घेता येणार आहे. त्याबरोबर वाहन चालकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजनाही राबविण्यात आली आहे. त्याबरोबर वाहन चालविताना चालक जखमी झाल्यास त्याला 25 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. या योजनांचा खासगी वाहनचालकांनी लाभ घ्यावा.
खासगी वाहनचालकांनी लाभ घ्यावा
आमच्या मुलाचा वर्षापूर्वी वाहन चालविताना अपघात होऊन मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वीच या विमा योजनेंतर्गत 5 लाखांची मदत मिळाली आहे. सर्व खासगी वाहनचालकांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा.
- शोभा गोवेकर (कणबर्गी)