अपमान अद्याप विसरलेलो नाही : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
माझा पुन्हा भाजपमध्ये समावेश व्हावा, यासाठी अनेक नेते आग्रही आहेत. पण मी परत जाण्याचा प्रश्नच येत नाही. माझा अपमान मी अजूनही विसरलो नाही, असे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले. हुबळी येथे पत्रकारांशी ते बोलत होते. मी भाजप सोडल्यानंतर झालेल्या नुकसानीची मला खात्री आहे. काही लोक मला परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परत आणण्यासाठी अनेक नेते दबाव टाकत असल्याची माहिती आहे. कोणीही प्रयत्न केले तरी मी भाजपमध्ये परतणार नाही, असे त्यांनी सांगितले.
शेट्टर पुढे म्हणाले, खासदार अनंतकुमार हेगडे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबद्दलच्या केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, अनंतकुमार हेगडे गऊडासारखे वागत आहेत. लक्ष्मण रेषा ओलांडून नको ते वक्तव्य करीत आहेत. इतके दिवस बेपत्ता असलेले आता अचानक प्रत्यक्ष झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपला शेट्टरांची गरज का आहे?
जगदीश शेट्टर यांची घरवापसी झाली तर भाजपसाठी लिंगायत समाजाची व्होट बँक मजबूत होईल. याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनाही बळ मिळाले. वरील कारणांमुळे जगदीश शेट्टर यांना भाजपमध्ये परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेट्टर यांनी निवडणुकीत काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून काम केले होते.