अवमान झाल्याने बाटली फोडली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सुधारित वक्फ कायद्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्यत्व 1 दिवसासाठी गमावलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नवीनच दावा केला आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार अभिजित गंगोपाध्याय यांनी आपल्याविरोधात अपशब्दांचा उपयोग केला. त्यामुळे संतापून मी पाण्याची बाटली समितीच्या अध्यक्षांच्या दिशेने भिरकावून फोडली असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. बाटली भिरकावल्याने त्यांचे समितीतून निलंबन झाले आहे.
काही दिवसांपूर्वी सुधारित वक्फ कायदा विधेयकावर विचार करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्षस्थान भारतीय जनता पक्षाचे खासदार जगदंबिका पाल यांच्याकडे आहे. या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे खासदार अभिजित गंगोपाध्याय आणि कल्याण बॅनर्जी यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. कल्याण बॅनर्जी यांनी संतापाच्या भरात पाण्याची काचेची बाटली टेबलावर आपटून फोडली आणि तिचा तुकडा अध्यक्षांच्या दिशेने भिरकावला होता. ही त्यांची कृती शिस्तभंग करणारी असल्याने अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी त्यांचे समिती सदस्यत्व निलंबित केले होते.
सारवासारवीचा प्रयत्न
या घटनेनंतर साधारणत: दोन आठवड्यांनी कल्याण बॅनर्जी यांनी आपल्या त्या कृतीचे समर्थन पत्रकार परिषदेत केले. अभिजित गंगोपाध्याय यांनी माझा शेलक्या शब्दांमध्ये अपमान केला होता. त्यांनी हेतुपुरस्सर असे शब्द माझ्यासंबंधी उपयोगात आणले होते. त्यामुळे माझ्या संतापाचा भडका उडाला आणि मी ती कृती केली, असा दावा त्यांनी मंगळवारी केला. गंगोपाध्याय यांनी मला माझे आईवडील आणि कुटुंबियांच्या नावाने अपशब्द उच्चारले. त्यामुळे माझा नाईलाज होता. मला भडकविण्यात आले होते, अशी सारवासारवी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
अध्यक्षांकडून अन्यायाचा आरोप
माझे समितीतून निलंबन अन्यायपूर्ण आहे. हा प्रकार घडला तेव्हा अध्यक्ष आसनावर नव्हते. ते नंतर आले. आल्यानंतर त्यांनी प्रकार समजावून घेतला. पण गंगोपाध्याय यांच्यासंबंधी त्यांनी सौम्य भूमिका घेतली. तथापि, माझ्या संदर्भात मात्र ते अत्यंत कठोर झाले. त्यामुळे केवळ माझ्यावर कारवाई करण्यात आली. मला एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले. ही कारवाई अन्यायपूर्ण होती. अध्यक्षांनी दोन्ही बाजू समजावून घ्यावयास हव्या होत्या, असे प्रतिपादन त्यांनी केले.