इन्सुलीतील तिलारी कालव्यातील मृतदेहाची 13 दिवसांनी ओळख; बांदा पोलिसांना यश
मिळालेल्या माहितीनुसार, राठोड हे सुमारे दीड महिन्यापूर्वी कोकणात मजुरीसाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते. त्यानंतर सुमारे 15 दिवसांपूर्वी त्यांनी एका व्यक्तीच्या मोबाईलवरून कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क साधला होता. मात्र, त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर 19 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आणि ओरोस येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
बांदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेश कुडतरकर यांच्यासह पोलीस पथकाने तपास करून मृतदेहाची ओळख पटवली.
दरम्यान, फूलचंद राठोड हे कोकणात नेमके कोणाकडे मजुरीचे काम करत होते, त्यांचा शेवटचा संपर्क कुठून झाला आणि त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. मृतदेह कालव्यात कसा पोहोचला, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणातील गूढ उकलण्याचे आव्हान बांदा पोलिसांसमोर आहे.