इन्सुली, मळगाव घाटी धोकादायकच !
झाडे ' जैसे थे 'च बांधकाम वन विभागाच्या अखत्यारितील प्रश्न
नीलेश परब
न्हावेली : पावसाळा तोंडावर आला असला तरी मळगाव आणि इन्सुली घाटीत असलेली धोकादायक झाडे ' जैसे थे ' च स्थितीत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभाग यांच्या अखत्यारित असलेल्या या झाडांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ती कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ऐन पावसाळ्यात ही झाडे कोसळल्यास वाहतुकीचा प्रश्नही निर्माण होणार आहे.त्यामुळे या दोन्ही घाटांतील धोकादायक झाडांचा सर्व्हे करुन त्याबाबत योग्य तो तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे.
● सावंतवाडीत तालुक्यातील मळगाव व इन्सुली ही दोन घाटी आहेत.साधारण एक ते दोन किलोमीटरच्या या घाटी आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभाग यांच्या अखत्यारित हा भाग आहे.मळगाव घाटीत सद्या गॅस पाईप लाईन टाकण्यात आली आहे.त्यासाठी खोदाई केली होती.खोदाई पाहता रस्त्याकडेला असलेल्या झाडांच्या मूळांना धोका पोहोचला आहे.आता पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.गेल्या काही वर्षात कोकणात सर्वात जास्त पाऊस झाला आहे.या पावसामुळे नुकसानही तेवढेच झाले आहे. अनेक वादळेही जिल्ह्याने अनुभवली आहेत.अशी वादळे येणाऱ्या पावसाळ्यात झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वादळी पावसात झाडे उमळून पडण्याचा धोका असतो.अशीच झाडे सद्या मळगाव व इन्सुली घाटीत आहेत.धोकादायक स्थितीतील ही झाडे आहेत. यामध्ये मोठे जुनाट वृक्ष खूप आहेत.हे वृक्ष वादळी पावसात कोसळल्यास मोठी जिवीतहानी होऊ शकते.तसेच वाहतूक ठप्प होऊ शकते.पावसाळा सुरु होण्यापूर्वी या दोंन्ही घाटीतील झाडे तोडावी लागणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभाग यांनी या झाडांचा सर्व्हे करणे आवश्यक आहे.वाहनचालकांमधून अनेकदा मागणी करुनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने एखादा अपघात झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का ? असा प्रश्नही विचारला जात आहे.
● मळगाव घाटीतून मी नियमित प्रवास करतो मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर वाहतूक जास्त आहे.पावसाळ्यात या झाडांचा धोका अधिक आहे.संबंधित विभागाने वेळेत लक्ष देऊन धोकादायक झाडांचा प्रश्न मार्गी लावावा.
--- हनुमंत पेडणेकर,सरपंच मळगाव