For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'बॉक्सवेल' कामामुळे इन्सुली परिसर बनला अपघातांचे केंद्र

04:18 PM Apr 19, 2026 IST | अनुजा कुडतरकर
 बॉक्सवेल  कामामुळे इन्सुली परिसर बनला अपघातांचे केंद्र
Advertisement

कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली ; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे सुरू असलेल्या 'बॉक्सवेल'च्या कामामुळे हा परिसर सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. संबंधित कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, महामार्ग विभाग अजून किती बळींची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.ज्या ठिकाणी रस्ता खणला आहे किंवा जिथे एकेरी वाहतूक सुरू आहे, तिथे नियमानुसार 'काम सुरू आहे' असे फलक, रिफ्लेक्टर्स किंवा बॅरिकेड्स असणे अनिवार्य आहे. मात्र, इन्सुली येथे अशा कोणत्याही प्रकारची तजवीज करण्यात आलेली नाही. शनिवारी गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या चारचाकीने धडक दिली. सुदैवाने कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. मात्र किरकोळ दुखापतीला सामोरे जावे लागले.या अपघाताचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यावर करण्यात आलेले खोदकाम आणि दिशादर्शक फलकांचा अभाव हेच असल्याचे समोर आले आहे.काही दिवसांपूर्वीच बॉक्सवेल कामाच्या जवळच झालेल्या एका भीषण अपघातात एका चार वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर कंत्राटदाराने केवळ नावापुरते गटाराला फलक आणि बॅरिकेड्स लावले, मात्र मुख्य कामाच्या ठिकाणी अजूनही परिस्थिती जैसे थे आहे.एखादा कंत्राटदार वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एक माणूस ठेवू शकत नाही का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. डोळ्यांसमोर अपघात होत असताना आणि लोकांचा जीव जात असताना महामार्ग विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेसा प्रकाश नसल्याने खणलेला रस्ता चालकांच्या लक्षात येत नाही, ज्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ​"कंत्राटदाराचा नफेखोरीचा हव्यास लोकांच्या जीवावर बेतत आहे. जोपर्यंत एखादा मोठा अनर्थ घडत नाही, तोपर्यंत प्रशासनाला जाग येणार नाही का? महामार्ग विभागाने तत्काळ या कामाची दखल घेऊन सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." असा इशारा स्थानिक ग्रामस्थ यांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.