अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे खातेदारांची ससेहोलपट; जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुलाची शिरोलीतील शाखेतील प्रकार
पुलाची शिरोली / वार्ताहर
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पुलाची शिरोलीतील रोज सुमारे वीस लाखांचा आर्थिक व्यवहार असलेल्या शाखेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे खातेदारांची ससेहोलपट होत आहे. बँकेच्या वरिष्ठांनी व्यवहार तत्काळ व सुलभ होण्यासाठी आवश्यक कर्मचारी नेमणूक करावी. अशी आग्रही मागणी खातेदारांच्याकडून होत आहे.
पुलाची शिरोली येथील जिल्हा बँकेच्या शाखेत सध्या शाखाधिकारी, कँशियर, हेड क्लार्क असे तिघेंजण संपूर्ण व्यवहार सांभाळत आहेत. त्यामध्ये सध्या दोन सेवानिव्रूत्त कर्मचारी मदतीला आहेत. पण खातेदारांची संख्या प्रचंड असल्यामुळे दिवसभर व्यवहार सांभाळताना अधिकारी व कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. तसेच वयोव्रध्द महिला व पुरुष तासंन तास रांगेत उभे राहून त्रास सहन करीत आहेत.
या बँकेत विशेषतः लिहीता वाचता न येणारे शेतकरी व खातेदारांची संख्या प्रचंड आहे. अशा लोकांच्या खातेवर किती रक्कम जमा आहे. त्यानुसार पे स्लिप भरुन घेणे, अंगठा उठवून घेऊन त्याला दस्तूर लावून घेणे, पासबुके भरुन देणे, अशी सर्व कामे बँकेतील हेड क्लार्कला करुन घ्यावी लागत आहेत. त्यामुळे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिव मेटाकुटीला आला आहे.
या शाखेत शिरोली व नागाव येथील सात विकास सेवा संस्थांचे सुमारे साडेतीन हजार सभासद शेतकरी, अकरा पतसंस्था, पाच दूध संस्था, सुमारे अडीचशे प्राथमिक , माध्यमिक शिक्षक व सेवक , अकरा हजार शासकीय विविध योजनेचे लाभार्थी, सुमारे शंभर पेन्शन धारक, अशी सुमारे चौदा हजार खातेधारकांचे या बँकेतून आर्थिक व्यवहार हाताळले जात आहेत.
एकूणच येथील शाखेत कर्मचाऱ्यांची अपुरी संंख्या व खातेदारांची प्रचंड संख्या यामुळे कर्मचारी व खातेदारांची सध्या ससेहोलपट सुरू आहे. हा त्रास टाळण्यासाठी बँकेच्या वरिष्ठांनी तत्काळ कर्मचारी नेमणूक करुन गैरसोय दूर करावी. अशी मागणी खातेदारांकडून होवू लागली आहे.
हातकणंगले तालुक्यात विद्यमान व्हा. चेअरमन आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक व विजयसिंह माने हे चार संचालक आहेत. पण अपुरी कर्मचारी असलेल्या शाखेत कर्मचारी नेमणूकीसाठी का प्रयत्न करीत नाहीत ? असा प्रश्न खातेदारांकडून उपस्थित होत आहे.