For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

CPR Hospital: अपुऱ्या बेडमुळे रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार, CPR मधील धक्कादायक प्रकार

02:13 PM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
cpr hospital  अपुऱ्या बेडमुळे रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार  cpr मधील धक्कादायक प्रकार
Advertisement

सीपीआर’मधील अपघात विभागात केवळ 11 बेड आहेत.

Advertisement

By : इम्रान गवंडी

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील अपघात विभागात बेडच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांना खाटेऐवजी जमिनीवर झोपवून उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे. त्यामुळे रूग्णांचे हाल होत आहेत. ‘सीपीआर’मधील अपघात विभागात केवळ 11 बेड आहेत. परंतु रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात.

Advertisement

अपघातग्रस्त रुग्णांना तातडीच्या उपचाराची गरज असते, परंतु बेडच्या कमतरतेमुळे अनेकांना खाटेऐवजी जमिनीवर किंवा बाकड्यांवर उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी याबाबत हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, अपघात विभागाच्या विस्ताराची मागणी जोर धरू लागली आहे.

सद्यस्थितीत सर्दी, तापाचे रूग्ण वाढत आहेत, त्यातच आता कोरोनाही पुन्हा डोके वर काढत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा स्थितीत प्रशासनाने गांभिर्य दाखवण्याची गरज आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम असण्याची गरज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दुर्दैवाने एखादी मोठी घटना घडल्यास डॉक्टर, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडणार आहे. सध्या, नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे पर्यायी व्यवस्था अपुरी पडत आहे. परिणामी, उपचारामध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

कचऱ्याचा प्रश्न गंभीर

सीपीआर’मधील नवीन केसपेपर विभागासमोर कचऱ्याचे ढीग असतात. त्याचा उठाव वेळेत होत नसल्याने कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनत आहे. रुग्ण आणि नातेवाईकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. कचरा व्यवस्थापनासाठी पुरेशा सुविधा नसल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

पोलीस चौकी शोधावी लागते

नूतनीकरणामुळे पोलीस चौकीला ठोस जागाच मिळत नसल्याचे चित्र आहे. अपघात प्रकरणांशी संबंधित तक्रारी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी येथे पोलीस चौकी महत्त्वाची आहे, परंतु जागेच्या अभावामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकदा इकडे तर एकदा तिकडे, असा सीपीआर पोलीस चौकीचा ताकतुंबा सुरू आहे. नातेवाईकांना पोलीस चौकी शोधावी लागत आहे.

खासगी लॅब प्रतिनिधींचा वावर सुरूच

सीपीआर’च्या विविध विभागात खासगी लॅब प्रतिनिधींचा वावर सुरूच आहे. अपघात विभागात हे चित्र नेहमी पहायला मिळत आहे. तपासणीच्या नावाखाली रूग्णांची लूट सुरू आहे. ‘सीपीआर’मध्ये वेळेत तपासणी होत नाही. काही तपासण्या केल्या जात नाहीत, त्यामुळे खासगी लॅब प्रतिनिधीकडे तपासण्या कराव्या लागत आहेत, असे एका रूग्णाच्या नातेवाईकाने सांगितले.

शिफ्ट करताना रूग्णाचे हाल

नूतनीकरणाच्या कामामुळे परिसरात प्रचंड खोदाई केली आहे. येथील रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात विभागातून अन्य विभागात रूग्णाला शिफ्ट करताना रूग्णांचे हाल होत आहेत. कर्मचारी, नातेवाईकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांची अपेक्षा

सीपीआर रुग्णालयातील समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. सीपीआर हॉस्पिटल हे शहरातील प्रमुख वैद्यकीय केंद्र आहे. येथील सुविधा सुधारणे आवश्यक आहे. अपघात विभागाचा विस्तार, कचरा व्यवस्थापन, रूग्णांच्या तपासण्या आदी प्रश्नावर व्यवस्थापनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

बेड वाढवण्यासाठी कार्यवाही

"साथींमुळे तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी होत आहे. अपघात विभागासह इतर विभागांवरही याचा ताण येत आहे. लवकरच अपघात विभागातील बेड वाढवण्यासाठी कार्यवाही केली जाईल. नूतनीकरणानंतर अद्ययावत अपघात विभाग तयार होणार आहे."

  • डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
Advertisement
Tags :

.