इस्पितळांच्या जीर्ण इमारती हटविण्याचे निर्देश
आरोग्य खात्याकडून खबरदारीच्या उपाययोजना : 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
बेंगळूर : राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याच्या अखत्यारितील जीर्ण झालेल्या जुन्या इमारतींच्या सुरक्षेबाबत सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्तालयाने या संदर्भात सर्व जिल्हा आणि तालुका अधिकाऱ्यांना परिपत्रक जारी केले आहे. राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी), सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी), तालुका व जिल्हा इस्पितळांना भेट देऊन तपासणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. इस्पितळाचा कोणताही वॉर्ड किंवा इमारत जीर्ण अवस्थेत आढळल्यास तेथील रुग्णांना तत्काळ दुसऱ्या सुरक्षित इमारतीत हलवण्याचे आदेश दिले आहेत.
दुरुस्ती आणि इमारत हटवण्याचे काम
अभियांत्रिकी विभागामार्फत जीर्ण अवस्थेत असलेल्या इस्पितळांच्या इमारतींची तपासणी करून, आवश्यक असल्यास तत्काळ दुरुस्तीकामे हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांनुसार जीर्ण आणि सध्या वापरात नसलेल्या इमारती पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी पावले उचलावीत, असे निर्देश आरोग्य खात्याने दिले आहेत. याबरोबरच इस्पितळांमधील विद्युत कनेक्शन सुरक्षेकडे लक्ष देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नोडल अधिकाऱ्यांवर जबाबदारी
जिल्हा नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांना भेटी देऊन जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांसोबत (डीएचओ) बैठक घ्यावी. इस्पितळांच्या इमारतींच्या स्थितीबाबतचा विस्तृत अहवाल 15 दिवसांच्या आत खात्याकडे सादर करावा. या निर्देशांचे पालन न केल्यास किंवा भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास, संबंधित अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरले जाईल, असा इशारा आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्तांनी दिला आहे. सदर सर्व माहितीची तपासणी करून आणि आवश्यक ती कार्यवाही केल्यानंतर अहवाल विहित ई-मेलवर पाठविण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा इस्पितळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
बेंगळुरातील दुर्घटनेनंतर सरकार सतर्क
बेंगळूरमध्ये 29 एप्रिल रोजी मुसळधार पावसामुळे बौरिंग आणि लेडी कर्झन इस्पितळाची संरक्षक भिंत कोसळून दोन मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. राज्यातील इतर सरकारी इस्पितळांच्या इमारतींची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य खाते सतर्क झाले आहे. जूनपासून पावसाळा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यातील सर्व इस्पितळांच्या इमारती व संरक्षक भिंतीची तपासणी केली जाणार आहे.