महाकुंभ चेंगराचेंगरीप्रकरणी ‘उच्च’मध्ये जाण्याचे निर्देश
सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रयागराज महाकुंभातील भाविकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. न्यायालयाने याचिकाकर्त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका आधीच दाखल करण्यात आली असून त्यात उत्तर प्रदेश सरकारच्या युक्तिवादाची न्यायालयाने दखल घेतली.
सर्वोच्च न्यायालयाने कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. अॅड. विशाल तिवारी यांनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यामध्ये देशभरातील भाविकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली. 28/29 जानेवारीच्या रात्री मौनी अमावस्येच्या दिवशी पहाटे 1.30 वाजता संगम नाक्यावर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 30 लोक ठार झाले आणि 60 जण जखमी झाले होते.