सर्व्हर समस्येमुळे सकाळपासून रात्री १० पर्यंत रेशन वितरण करण्याची सूचना
अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या उपसंचालकांकडून दुकानाला भेट देऊन पाहणी
बेळगाव : चालू महिन्यात रेशन वितरण करतेवेळी सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत असल्याने रेशन कार्डधारकांच्या बोटांच्या ठश्यांचे नमुने घेण्यास विलंब होत आहे. त्यातच दोन वेळा थंब घ्यावे लागत असल्याने दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नागरिकांनाही तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे, अशी तक्रार दुकानदारांनी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक मल्लिकार्जुन नाईक यांनी बुधवारी सकाळी शहरातील एका रेशन दुकानाला भेट देऊन पाहणी केली.
रेशन कार्डधारकांना या महिन्यात केंद्र सरकारच्या कोट्यातील तांदळाचे वितरण केले जात आहे. बीपीएल रेशन कार्डधारकांना प्रतिमाणसी दहा किलो तर अंत्योदय रेशन कार्डला 70 किलो तांदूळ दिला जात आहे. राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेतील तांदूळ जून महिन्यात दिला जाणार आहे. चालू महिन्यात केवळ केंद्र सरकारच्या कोट्यातील तांदळाचे वितरण केले जात असल्याने त्यासाठी दोन वेळा थंब घेतला जात आहे. राज्यभर दोन वेळा सर्व रेशन दुकानांमध्ये थंब घेतले जात असल्याने सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत आहे.
त्यामुळे थंब घेण्यास उशीर होत असल्याने सकाळपासून रात्रीपर्यंत रेशन दुकानदार याच कामात व्यस्त आहेत. परिणामी रेशन कार्डधारकांनाही दुकानांबाहेर तासन्तास रांगेत थांबण्याची वेळ आली आहे. दुकानदार आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी सर्व्हर समस्या सोडविण्यासह एकच वेळ थंब घ्यावा, अशा मागणीचे निवेदन नुकतेच रेशन दुकानदारांच्यावतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक मल्लिकार्जुन नाईक यांनी बुधवारी सकाळी स्वत: शहरातील एका रेशन दुकानाला भेट देऊन पाहणी करण्यासह त्यांनी अधिक माहिती जाणून घेतली.
रेशन दुकानदारांना आवाहन
राज्यभर एकाच वेळी थंब घेण्याचे काम सुरू असल्याने सर्व्हर समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सकाळपासून रात्री 10 पर्यंत रेशन वितरणाचे काम सुरू ठेवण्याची सूचना करण्यात आली असल्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक मल्लिकार्जुन नाईक यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.