For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विरोध करण्यापेक्षा सूचना मांडा

12:54 PM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
विरोध करण्यापेक्षा सूचना मांडा
Advertisement

गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष दामू नाईक यांचे आवाहन

Advertisement

पणजी : एखाद्या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा या शेवटी नागरिकांसाठीच असतात. तरीही अनेकदा चांगल्या कार्यासही विरोध करण्यात येत असतो. सध्या तिसऱ्या जिह्याससुद्धा काही भागातून विरोध होऊ लागला आहे. परंतु अशाप्रकारे विरोधच करण्यापेक्षा ते काम अधिक आदर्श आणि चांगल्या प्रकारे होण्यासाठी नागरिकांनी त्यात सकारात्मक सूचना मांडाव्यात, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले. शुक्रवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार नीलेश काब्राल, माजी खासदार विनय तेंडुलकर यांची उपस्थिती होती. राज्याची लोकसंख्या आणि पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाचे विकेंद्रीकरण आवश्यक होते. म्हणूनच राज्यात तिसऱ्या जिह्याची निर्मिती करण्यात आली आहे. या जिह्यामुळे या भागात विविध पायाभूत सुविधा निर्माण होतील. त्यांच्या माध्यमातून  स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. त्यात प्रशासकीय इमारती, ऊग्णालये, शैक्षणिक संस्था यांच्यासह अन्य साधनसुविधा प्रकल्पांचा समावेश असेल, असे नाईक यांनी सांगितले.

Advertisement

स्थानिकांची सोय होणार

राज्यात दरवर्षी सुमारे एक कोटी पर्यटक भेट देतात. त्यामुळे राज्याची  लोकसंख्याही मोठ्या गतीने वाढत आहे. अशा स्थितीत केवळ दोनच जिह्यांमुळे प्रशासनावर ताण येत होता. कामे होण्यास विलंब होत असल्याने लोकांची गैरसोय होत होती. त्यावर उपाय म्हणून तिसऱ्या जिह्याची निर्मिती करून प्रशासकीय विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांची सोय होणार आहे, असे नाईक म्हणाले.

गोव्यात प्रत्येक नवीन गोष्टीला विरोध करण्याची काहींना सवयच झाली आहे. त्यातूनच यापूर्वी कोकण रेल्वे, मोपा विमानतळ यासारख्या प्रकल्पांना विरोध झाला होता. परंतु ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तेच लोक आघाडीवर आहेत. नवीन जिह्याबाबतही भविष्यात हेच दिसून येणार आहे. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा कोणाचे काही आक्षेप असल्यास त्यांनी ते सरकारला कळवावे, त्यावर नक्कीच विचार केला जाईल, असे नाईक यांनी सांगितले.

‘कुशावती‘ नाव अर्थपूर्ण, समर्पक

मंत्री सुभाष फळदेसाई यांनी बोलताना, हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कुशावती नदीकाठी संस्कृती बहरली होती. त्यामुळे या जिह्यास देण्यात आलेले ‘कुशावती’ हे नाव पूर्णत: योग्य, अर्थपूर्ण व समर्पक आहे. या जिह्यामुळे त्यात समाविष्ट चारही तालुक्यांमधील लोकांना अन्य सरकारी कामांसंबंधी सुविधा तर मिळतीलच, शिवाय शिक्षण, रोजगार यातही संधी प्राप्त होतील, असा विश्वास व्यक्त केला. मात्र असे असले तरी या सर्व सुविधा लगेचच निर्माण होणार नाहीत. त्यासाठी पुढील किमान पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्याचा दीर्घकालीन फायदा नंतर येथील स्थानिकांनाच होईल. कुशावती जिह्यामुळे खास करून या भागात बहुसंख्य असलेल्या एसटी समाजाला लाभ होणार आहे. त्याशिवाय केंद्राच्या तसेच राज्याच्या विविध सामाजिक कल्याणकारी योजना राबवणे राज्याला अधिक सोपे बनणार आहे. त्यातून या भागाचा सर्वांगीण विकास होईल, अशी अपेक्षा फळदेसाई यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.