For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विचार करत बसण्यापेक्षा कृती करा

11:58 AM Feb 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
विचार करत बसण्यापेक्षा कृती करा
Advertisement

‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गोर यांचा सल्ला : कांपाल - पणजी येथे आयोजित पुस्तक महोत्सवातील वार्तालाप

Advertisement

पणजी : ‘करुन बघू या, काय होते ते’ या विचाराने पुढे गेले म्हणून अभिनय क्षेत्रात नाव कमावले. कसे होणार? कोण मदत करणार? पाठिंबा देणार? असा विचार करीत बसले असते तर तेथेच राहिले असते. म्हणून प्रत्यक्ष कृती करावी, असा सल्ला ‘बालिका वधू’ या मालिकेतील ‘आनंदी’ची भूमिका साकारणारी अविका गोर यांनी दिला. मुलांना देखील त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे, असेही गोर यांनी सांगितले. कांपाल - पणजी येथील बांदोडकर मैदानावर चालू असलेल्या गोवा पुस्तक महोत्सवात गोर यांच्याशी वार्तालाप झाला. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत दिलखुलासपणे व्यक्त केले. पत्रकार वेदांता अगरवाल यांनी विविध प्रश्न करुन हा वार्तालाप खुलवला आणि गोर यांनी तितकीच समर्पक उत्तरे देऊन तो रंगवला.

‘बालिका वधू’त मिळालेल्या चांगल्या माणसांमुळे यशस्वी

Advertisement

‘बालिका वधू’ मालिकेचे चित्रीकरण करताना चांगली माणसे भेटली. त्यांच्यामुळेच पुढे जाण्याचा मार्ग मिळाला हे आपण कधी विसरणार नाही. योगायोग आणि भाग्याने देखील आपली साथसंगत केली म्हणून आपण पुढे चित्रपटात इतर मालिकेत रिअॅलिटी शोमध्ये काम करु शकले. ‘बालिका वधू’मधील भूमिकेसाठी आपल्याकडे कोणतेही नियोजन व तयारी नव्हती. तरीही सर्वांच्या सहकार्याने ‘करुन बघू’ या कृतीने पुढे गेले आणि ध्येय साध्य केले असे गोर यांनी सांगितले. आजी - आजोबांचे निधन झाले तेव्हा त्याचा कोणताही परिणाम भूमिकेवर होऊ दिला नाही, असेही गोर यांनी नमूद केले. या वार्तालापासाठी तसेच अविका गोर यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. गोवा पुस्तक महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत असून तो वाढत आहे. आयोजकांतर्फे गोर व अगरवाल यांचा शाल, भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. रविवार दि. 8 फेब्रुवारीपर्यंत हा पुस्तक महोत्सव चालणार आहे.

नातेसंबंधात आपुलकी, प्रेम असणाऱ्या भूमिकांना प्राधान्य

मालिका किंवा चित्रपटाचे कथानक वाचून आपण भूमिका करायचा निर्णय घेते. त्यासाठी दिग्दर्शक-लेखक यांच्याशी मनमोकळेपणाने बोलते. कथा पसंत नसेल तर स्पष्टपणे नकार देते. नुसत्या नाच-गाणी करणाऱ्या भूमिका मला करायच्या नाहीत. भूमिकेत काहीतरी मोल, मूल्य असायला हवे. नातेसंबंधातील आपुलकी, प्रेम या विषयांशी संबंधित भूमिका करणे आवडते आणि त्याला प्राधान्य देते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.