मीटर बसवून पाणी बिल दुरुस्त करून द्या! पाचगाव ग्रामपंचायतीची जीवन प्राधिकरणकडे मागणी
पाचगाव वार्ताहर
पाचगाव साठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी बसवलेले मीटर नादुरुस्त आहे. पाणी मीटर बसवून मिळावे व पाणी बिल कमी करून मिळावे अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत पाचगाव साठी पूर्वी दररोज सुमारे सहा लाख लिटर पाणीपुरवठा सुरू होता . सध्या केवळ सहा लाख लिटर दररोज पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी पाणी मीटर बसवले होते ते नादुरुस्त आहे. जेवण प्राधिकरण कडून बारा लाख लिटर पाणीपुरवठा सुरू असताना जेवढे पाणी बिल दिले जात होते तेवढेच पाणी बिल सध्या सहा लाख लिटर पाणीपुरवठा सुरू असताना देखील देण्यात येत आहे. यामुळे हे पाणी बिल कमी करून मिळावे तसेच पाण्याची मीटर बसवून मिळावे अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे करण्यात आली आहे.
पाचगाव साठी पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईन वरूनच मोरेवाडी ला देखील पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे मोरेवाडी साठी पाचगावकरांचेच पाणी जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मोरेवाडी साठी वेगळी पाईपलाईन देण्यात यावी अशी मागणी पाचगाव ग्रामपंचायत ने केली आहे. पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य संग्राम पोवाळकर, अतुल गवळी, कोअर कमिटी अध्यक्ष नारायण गाडगीळ, उपाध्यक्ष संजय पाटील, शांताराम पाटील यांनी हे निवेदन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता वी डी वाईकर यांना दिले.