भगवान रामलल्लांची गर्भगृहात स्थापना
अयोध्येसह सारा देश ‘राममय’, ‘प्राणप्रतिष्ठेची सज्जता पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जानेवारीला ‘देवनगरी’त येणार
वृत्तसंस्था /अयोध्या
अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी साकारण्यात येत असलेल्या भव्य राममंदिरातील गर्भगृहात भगवान रामलल्लांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. कृष्ण पाषाणातून साकारलेली ही शिल्पकृती असून ती 51 इंच उंच आहे. ती 5 वर्षे वयाच्या बालस्वरुप कोदंडधारी रामलल्लांची आहे. या मूर्तीची छायाचित्रे अधिकृतरित्या अद्यापही प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत. या मूर्तीचे दर्शन 22 जानेवारीच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ कार्यक्रमानंतरच सर्वसामान्य भाविकांना होणार आहे.
कर्नाटकातील सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगिराज यांनी निर्माण केलेली भगवान रामलल्लांची ही मूर्ती गुरुवारी पहाटे राममंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आली. त्यानंतर अत्यंत दक्षतापूर्वक तिची स्थापना गर्भगृहातील विशेष आसनावर करण्यात आली. यासाठी भारवहन यंत्राचा उपयोग करण्यात आला. स्थापना करण्यात येत असताना आणि स्थापना झाल्यानंतर मंत्रांचा घोष करण्यात आला. तसेच स्थापनेनंतर ‘गणेशांबिका पूजन’ करण्यात आले. ‘आयुष्यमंत्रा’चे पठण करण्यात आले. जलाधिवास आणि गंधाधिवास ही अनुष्ठाने झाल्यानंतर संध्याकाळी मूर्तीची आरती करण्यात आली. मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी विशेष आसनाचे ‘पंचगव्या’ने शुद्धीकरण करण्यात आले. त्यानंतर गर्भगृह आणि मंडपाचे वास्तूपूजन करून वास्तूशांती करण्यात आली, अशी माहिती व्यवस्थापनाने दिली आहे.
कर्मकुटी होमाची सांगता
भगवान रामलल्लांची मूर्ती ज्या स्थानी निर्माण करण्यात आली. त्या स्थानी मंगळवारी ‘कर्मकुटी होम’ आयोजित करण्यात आला होता. त्याची सांगता मंगळवारीच झाली. मंगळवारीच मंडपात ‘वाल्मिकी रामायण’ आणि ‘भूसुंदी रामायणा’चे पठण करण्यात आले. ‘द्वादशाब्द’ पक्षाच्या प्रारंभी ‘गोदाना’ची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर ‘दशदाना’चा समारंभ पार पडला. नंतर कर्मकुटी होमाचा प्रारंभ करण्यात आला, असेही न्यासाकडून स्पष्ट करण्यात आले.
प्राणप्रतिष्ठेची सज्जता जोरात
भगवान रामलल्लांचा ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. त्यासाठी अयोध्या सज्ज होत आहे. राममंदिराच्या परिसरात सज्जता आता पूर्णत्वास येत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांचे तीन दिवसांपूर्वीच अयोध्येत आगमन झाले असून ते प्राणप्रतिष्ठापूर्व अनुष्ठानांचे सूत्रसंचालन करीत आहेत. त्यांनी आगमनानंतर सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
भगवान रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा प्रारंभ इंग्रजी कालमानानुसार 22 जानेवारी 2024 या दिवशी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी केला जाणार आहे. त्या दिवसाची तिथी पौष शुक्ल कूर्मद्वादशी, विक्रम संवत 2080 अशी आहे. ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याचे प्रमुख ‘यजमान’ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. ‘प्राणप्रतिष्ठा’ हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सर्व नियमांचे पालन शास्त्रशुद्ध पद्धतीने होणार असून या सोहळ्याचा मुहूर्त ‘अभिजित मुहूर्त’ म्हणून गणला जातो. ही सर्व माहिती मंदिर निर्माण न्यासाने सविस्तररित्या दिली आहे.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
भगवान रामलल्लांच्या मूर्तीच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ समारंभाला देशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या वेळी 400 हून अधिक साधुसंतांची उपस्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांमधील अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठांची उपस्थितीही या कार्यक्रमाला लाभणार आहे. ‘प्राणप्रतिष्ठे’च्या पवित्र आणि स्वर्गीय क्षणाचा अनुभव घेण्यासाठी अब्जावधी रामभक्त प्रतीक्षा करीत आहेत.
- भगवान रामलल्लांच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर आनंदी-आनंद
- 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची साऱ्या देशाला उत्कंठा
- प्राणप्रतिष्ठापूर्व अनुष्ठाने होत आहेत पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार