रेल्वेस्टेशन-पोस्टमन सर्कल मार्गावर पथदीप बसवा
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्टेशन हे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानक असल्याने दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. परंतु रेल्वे स्टेशन परिसर तसेच रेल्वे स्टेशन ते पोस्टमन सर्कल या रस्त्यावरील पथदीप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. रात्रीच्या वेळी ये-जा करण्यासाठी प्रवाशांना अडथळे येत आहेत. त्यामुळे या परिसरात पथदीप बसविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे केली. रेल्वेस्थानक परिसर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीत येतो. रात्रभर रेल्वे दाखल होत असल्याने प्रवाशांची ये-जा सुरू असते. रेल्वेने दाखल झालेले प्रवासी पोस्टमन सर्कलमार्गे बाजारात येतात. परंतु रेल्वे स्टेशन ते पोस्टमन सर्कल या परिसरात पथदीप बंद आहेत. यामुळे रात्रीच्या अंधारात वाट काढत प्रवासी ये-जा करीत आहेत. पथदीप नसल्याने मद्यपींकडून महिला तसेच युवतींना त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डशी संपर्क साधून पथदीप बसवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपण कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.