स्मार्ट मीटर जोडा अन्यथा नळ कनेक्शन होणार कट
सातारा :
पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या सातारा शहरातील कनेक्शनना स्मार्ट मीटर बसवण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. त्याकरता पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची पथके कामाला लागली आहेत. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी सातारा नगरपालिकेच्यावतीने संबंधितास नोटीस बजावत आहे. त्या नोटीसीनुसार कागदपत्रे दाखवल्यानंतर लगेच स्मार्ट मीटर बसवला जात आहे. मात्र, काही ठिकाणी या स्मार्ट मीटरला काही सातारकरांचा विरोध होवू लागला आहे. स्मार्ट मीटर बसवल्यामुळे बोगस नळ कनेक्शन आणि पाणी बचत होणार आहे.
सातारा शहरातला अर्धा भाग हा पालिकेकडे तर अर्धा भाग हा प्राधिकरणाकडे पाणी पुरवठा करण्यासाठी आहे. प्राधिकरणाच्या भागात नळांना मीटर आहेत. तर पालिकेच्या हद्दीतील नळांना जेव्हा निळी पाईपलाईन टाकली तेव्हा मीटर बसवले होते. मात्र, त्यावेळी मीटर गायब झाले तर काही मीटर आहे त्याच स्थितीत बंद अवस्थेत आहेत. नव्याने सातारा नगरपालिकेच्यावतीने नळ कनेक्शनना स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात झाली आहे. हे मीटर अत्याधुनिक असे आहेत. त्या मीटरमध्ये पाण्याचा वापर किती झाला हे समजणार आहे. त्याचबरोबर जलवाहिनीत कुठे बिघाड झाला याचीही माहिती नमूद होणार आहे. हे मीटर बसवण्यासाठी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून गेल्या चार दिवसांपासून शहराच्या पश्चिम भागात प्रारंभ करण्यात आला आहे. त्याकरता टीम नियुक्त केलेल्या आहेत. त्या टीमकडून अगोदर संबंधित नळ मालकास नोटीस बजावली जाते. त्या नोटीसीनुसार कागदपत्रांची पाहणी केली जाते. नळ जोडणीची पावती, पाणी कर भरल्याची पावती पाहूनच नळाला मीटर जोडला जात आहे. मात्र, संबंधित नळ मालकाने जर माहिती दिली नाही तर नळ कनेक्शन कट केले जात आहे. तशा कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या आहेत.
त्यामुळे काही ठिकाणी वादावादीचे प्रकार घडत आहेत. त्याबाबतच्या काही तक्रारीही पाणी पुरवठ्याच्या अभियंत्यांकडे पोहचल्या असता त्यांनी स्पष्टपणे माटर बसवणार आहोत. तसेच नळ कनेक्शन अनाधिकृत वापरात असला तर पालिकेकडून कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही सातारकरांचा विरोध होवू लागला आहे.
- पाण्याचे बिल वाढण्याची भीती
सध्या पालिकेकडून पाणी बील हे वर्षाकाठी २ हजार रुपयांच्या दरम्यान येते. मात्र, मीटर बसवण्यात आल्यानंतर पाण्याचे बील वाढणार असल्याची भीतीही काहींनी व्यक्त केली आहे.
- बोगस नळ कनेक्शनला बसणार आळा
अनेक ठिकाणी बोगस नळ कनेशक्शन घेवून मोफत पाणी वापर करतात. परंतु त्यांच्यावर पालिकेकडून ठोस कारवाई होत नव्हती. आता मात्र, या मीटर जोडणीवेळी बोगस नळकनेक्शन प्रकाराला पूर्णतः आळा बसणार आहे.