कोलवाळ कारागृहात तुरुंग महानिरीक्षकांचा छापा
48 मोबाईल अन्य उपकरणासह चरस, गांजा, तंबाखू जप्त
प्रतिनिधी/ पणजी
कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात तुरुंग महानिरीक्षकांच्या नेतृत्त्वाखाली उत्तर गोवा अधीक्षक आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी 200 पोलिसांच्या ताफ्यासह कोलवाळ तुरुंगात छापा मारून झडती घेतली असता 48 मोबाईल व अन्य उपकरणे, तसेच तंबाखू, सिगारेट आणि चरस व गांजाही जप्त करण्यात आला. पोलिसानी बेधडक कारवाई करताना तुऊंगातील मोबाईल चार्जिंग पॉईंटही काढून टाकले.
प्रत्येकवेळी तुरुंगात छापा मारून मोबाईल व अन्य सामान जप्त केले जाते, हे सामान तुरुंगाच्या आत येतेच कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तुरुंगात घडणाऱ्या विविध कारणामुळे तुऊंगाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. आता हे प्रकरण अतीगंभीर झाले असून तुरुंग महानिरीक्षक याबाबत गंभीर झाले असून त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन कारवाई केली आहे. तुरूंगात मोबाईल व अन्य बेकायदा वस्तू पोहचणे यात तुरूंगातीलच कर्मचारी गुंतल्याची दाट शक्यता आहे व त्यादृष्टीने तपासकार्य सुरू आहे. यामुळे अनेक कर्मचारी रडारवर असून या प्रकरणात गुंतलेल्यांची गय केली जाणार नसल्याचे तुरुंग महानिरीक्षकांनी बजावले आहे. अनेकजण यात अडकण्याची शक्यता आहे.
जप्त करण्यात आलेले मोबाईल
कन्वीक्ट ब्लॉकमध्ये 3 मोबाईल, मेस ब्लॉक-2 मोबाईल, एनडीपीएस ब्लॉक-7 मोबाईल, नव्याने आलेल्या कैद्यांचा ब्लॉक ा 4 मोबाईल, ब्लॉक 4 मध्ये 12 मोबाईल जप्त, ब्लॉक 3 मध्ये 5 मोबाईल, शिक्षा झालेल्या कैद्यांचा ब्लॉक-2 मोबाईल, खटला सुऊ असलेल्या कैद्यांच्या ब्लॉकमध्ये-9 मोबाईल, महिला ब्लॉकमध्ये 4 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. याशिवाय साधा तंबाखू, उच्च दर्जाचा तंबाखू, सिगारेट व चरस व गांजाही जप्त करण्यात आला आहे.
तुरुंगात छापा टाकण्याच्या घटनेवेळी तुरुंग महानिरीक्षक यांच्यासह अधीक्षक हरीष मडकईकर, राहुल गुप्ता, विश्राम बोरकर तसेच निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह 200 आयआरबी पोलिसांचा ताफा हजर होता.