श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपाकडून पाहणी
रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासह कपिलेश्वर तलाव परिसरात यंत्रसामग्री उभी करण्याबाबत केली सूचना
बेळगाव : महानगरपालिकेच्यावतीने विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी शुक्रवारी सकाळी करण्यात आली. समादेवी मंदिरपासून किर्लोस्कर रोड, टिळक चौक, हेमू कलानी चौक, कपिलेश्वर ओव्हरब्रिज आणि विसर्जन तलावांची पाहणी करण्यात आली. त्याठिकाणी असलेल्या अडचणी दूर करण्याबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, मुख्य अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह इतर नगरसेवक व अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी केली. काही ठिकाणी गटारींवर फरशी नसल्याने समस्या निर्माण होणार आहे, तेव्हा त्या गटारींवर फरशी घालावी, असे सांगण्यात आले.
आतापर्यंत या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात आले असले तरी काही ठिकाणी अजूनही डागडुजी करणे बाकी आहे. तेव्हा त्यांचीही दुरुस्ती करा, असे सांगण्यात आले. विशेषकरून कपिलेश्वर ओव्हरब्रिजवर खडी उखडली आहे. पावसामुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. त्यावेळी घाईगडबडीत खडी घालण्यात आली. मात्र, सध्या ती खडी उखडली असून आता येत्या दोन दिवसांत संपूर्ण नव्याने दुरुस्ती करावी, अशी सूचना केली आहे. या रस्त्यावर असलेले अडथळे दूर करणे, लोंबकळणाऱ्या विद्युततारा दुरुस्त करण्यात आल्या आहेत. मात्र, काही तारा अजूनही लोंबकळतच आहेत. तेव्हा संबंधित विभागाला सूचना करण्याचे ठरविण्यात आले.
श्रीमूर्ती विसर्जन मार्गावर झाडे कमी आहेत. टिळक चौक व हेमू कलानी चौकाजवळ काही झाडे आहेत, त्यांच्या फांद्या अडथळा ठरत आहेत. त्या हटवाव्यात, असे सांगण्यात आले. यापूर्वी काही फांद्या दूर करण्यात आल्या तरी मोठ्या मूर्तींना आणखी काही फांद्या अडथळा ठरण्याची शक्यता आहे. तेव्हा त्या हटवाव्यात, असे महापौर सविता कांबळे यांनी सांगितले. धर्मवीर संभाजी चौक येथे गॅलरी उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणीही पाहणी करण्यात आली. वाहतुकीला तसेच श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीला अडथळा येऊ नये, अशा पद्धतीने गॅलरी उभी करावी, असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले. यावेळी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, बसवराज मोदगेकर, संतोष पेडणेकर, सिद्धार्थ भातकांडे, महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी, अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, मनपा उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्यासह इतर अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
कचरा न करण्याचे आवाहन
काही समाजमाध्यमे याचबरोबर विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही गॅलरी उभी करतात. त्यांनाही अडथळा होऊ नये, अशी सूचना करण्याविषयी सांगण्यात आले. कपिलेश्वर तलाव येथे महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी ज्या पद्धतीने यंत्रणा राबविण्यात येते, त्याच पद्धतीने यावर्षीही यंत्रणा उपलब्ध करावी, असे स्पष्ट करण्यात आले. सध्या दोन्ही तलावांची स्वच्छता केली आहे. मात्र, घरगुती मूर्तीही विसर्जन करण्यात येत असतात. तेव्हा संबंधित नागरिकांना त्याठिकाणी कचरा करू नये, अशी सूचना करावी, असे सांगण्यात आले.