मुख्यमंत्र्यांकडून शिरूर येथील नैसर्गिक आपत्तीची पाहणी
दुर्घटनेची कसून चौकशीसह दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची माहिती : सहाव्या दिवशीही शोधमोहीम शुरूच
कारवार : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी मुसळधार पाऊस कोसळत असताना अंकोला तालुक्यातील शिरूर येथील नैसर्गिक आपत्तीची पाहणी केली. शिरूर येथील दुर्घटना स्थळाची पाहणी करून आणि हाती घेण्यात आलेल्या कामाची माहिती घेऊन पत्रकाराशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 चे रूंदीकरण करताना चुकीच्या आणि अवैज्ञानिक बांधकामामुळेच शिरूर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे, असा आरोप केला जात आहे. चूक कोणीही केली तरी त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल. रस्त्याचे काम पूर्णत्वाला नेण्यापूर्वीच टोलवसूल केली जात आहे, अशी माहिती मिळाली आहे. दरड हटविण्याचे आणि बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुर्घटनेची कसून चौकशी केली जाईल आणि दोषीवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले. दरम्यान, कारवार जिल्ह्यातील शाळा, पदवीपूर्व महाविद्यालयांना सोमवारी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या मंगळवारी (ता. 16) शिरूर येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर प्रचंड प्रमाणात दरड कोसळून मोठी जीवित आणि वित्तीय हानी झाली आहे. रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटविण्यासाठी आणि दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय नौसेना, अग्निशमन दल, आयआरबी, बांधकाम कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून आणि किनारपट्टी पोलीस दलाकडून युध्दपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहीम राबविण्यासाठी नेहमीच्या यंत्रसामुग्रीसह, मेटल डिटेक्टर, रडार आदी यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे. तरीसुद्धा मातीचे ढिगारे हटविण्यात आणि बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यात अपेक्षित यश आलेले नाही. दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेतलेल्या पंतप्रधान मोदी यांनी रविवारी शिरूर येथे दरड हटविण्यासाठी आणि बेपत्ता झालेल्यांचा शोध लावण्यासाठी भारतीय सेना पाठविण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार 44 सैनिकांचा समावेश असलेले बेळगाव येथील एमएलआरसीचे पथक येथे दाखल झाले आहे.
नदीच्या पाण्यातही स्कॅन करण्याच्या सूचना
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, गंगावळी नदीत वाहने वाहून गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे सैनिकांना, भारतीय नौसेनेला, एनडीआरएफला सूचना करण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत शोधकार्य थांबविण्यात येणार नाही. केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यासह कांही विरोधकांकडून शिरूर दुर्घटनेचे राजकारण केले जात आहे. तथापि आम्ही राजकारण करणार नाही. शोधमोहिमेला विलंब झाला. मुख्यमंत्री तातडीने घटनास्थळी का दाखल झाले नाहीत असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. वास्तविकता ही आहे की, दुर्घटना घडलेल्या क्षणापासून दरड हटविण्याची आणि बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, स्थानिक आमदार सतीश सैल, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यदर्शी सुरुवातीपासून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. जिल्हा पालकमंत्र्यांनीच योग्य त्या सूचना केल्या आहेत. यावेळी महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे, जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, आमदार सतीश सैल, आमदार शिवराम हेब्बार, आमदार भीमण्णा नाईक आदी उपस्थित होते.
मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
सिद्धरामय्या म्हणाले, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्यात येईल. यापूर्वीच शिरूर घटनास्थळी मेटल डिटेक्टर, रडार आदी यंत्रणाचा वापर केला आहे. आता उपलब्ध असलेल्या प्रगत उच्च दर्जाच्या आणि अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेच्या नंतर सात जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. अद्याप तिघे बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.