फ्लायओव्हर-रिंगरोडच्या ब्ल्यू प्रिंटची पालकमंत्री जारकीहोळकडून पाहणी
अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली माहिती : प्रकल्पांची अर्थसंकल्पात करणार तरतूद
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील वाहतूक समस्या लक्षात घेत याला पर्याय म्हणून फ्लायओव्हर आणि रिंगरोडचे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. त्यामुळे नियोजित प्रकल्पांच्या ब्ल्यू प्रिंटची पाहणी करण्यासह पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती जाणून घेतली.
शनिवार दि. 1 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित फ्लायओव्हर आणि रिंगरोडबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या वाढली असल्याने संकम हॉटेलपासून राणी चन्नम्मा चौकापर्यंत फ्लायओव्हर उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच रिंगरोडचे कामदेखील हाती घेतले जाणार आहे. यंदाच्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. प्रस्तावित फ्लायओव्हर आणि रिंगरोड प्रकल्पाचा नकाशा तयार करण्यात आला असल्याने या प्रकल्पांना कोणकोणत्या भागांचे रस्ते जोडण्यात आले आहेत, याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी फ्लायओव्हर व रिंगरोड गरजेचा आहे, असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.