Kolhapur : पंचगंगा स्मशानभूमीतील शेणी–लाकूड साठ्याची प्रशासकांकडून तपासणी
01:05 PM Nov 24, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
घाटावरील आकांक्षी शौचालयाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना
कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमी परिसरात सुरू असलेल्या कामांची तसेच शेणी व लाकडाच्या साठ्याची तपासणी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आज दुपारी केली. स्मशानभूमीतील शेणी व लाकडाबाबत प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान त्यांनी दानस्वरूपात आलेली शेणी, ठेकेदारामार्फत महापालिकेकडे जमा होणारी शेणी आणि उद्यान विभागातून स्मशानभूमीत दाखल होणाऱ्या लाकडाच्या साठ्याची नोंदणी रजिस्टर तपासून पाहिली. मागील सहा महिन्यांचे सर्व रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना सहायक आयुक्तांना देण्यात आल्या. त्यानंतर स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाच्या कामाचीही पाहणी करून गतीने काम करण्याचे निर्देश दिले.
स्मशानभूमीतील लाकुड व शेणीसाठी असलेले शेड कमकुवत झालेने ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश शहर अभियंता यांना दिले. त्याचबरोबर या ठिकाणी असलेली टॉयलेटही दुरुस्त करण्याबाबत एस्टीमेट सादर करण्याचे आदेश दिले. यानंतर पंचगंगा घाटावर नव्याने बांधल्या जात असलेल्या आकांक्षी शौचालयाची (अस्परेशन टॉयलेट) पाहणी करून हे काम डिसेंबर अखेर पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आल्या. तसेच घाट परिसरातील बोटॅनिकल गार्डनमधील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून देण्याचे निर्देश शहर अभियंत्यांना दिले.
या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहायक आयुक्त कृष्णा पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे आणि आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे उपस्थित होते.
Advertisement
Advertisement