अगसगा ग्रा. पं. मधील कागदपत्रांची अधिकाऱ्यांकडून पाहणी
उद्योग खात्री योजनेतील निधीचा दुरुपयोग केल्याने कारवाई
वार्ताहर/अगसगे
अगसगे ग्राम पंचायतमधील उद्योग खात्री योजनेमध्ये शंभर टक्के काम मशिनरी लावून करण्यात आले आहे. यातील सर्व निधीचा दुरुपयोग करण्यात आला आहे तसेच योजनेतील संपूर्ण नियम धाब्यावर ठेवून काम करण्यात आले आहे तरी संबंधित जिल्हा व तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून सर्व निधी संबंधितांकडून शासनाला परत जमा करावा, अशा मागणीचे निवेदन दलित प्रगती पर सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवपुत्र मेत्री यांनी दिले होते. त्या संदर्भात गुरुवार दि. 27 रोजी ता. पं. अधिकाऱ्यांनी ग्राम पंचायतीला दुसऱ्यांदा भेट देऊन संपूर्ण कामाच्या कागदपत्रांची पाहणी केली.
गावातील गणपती मंदिरपासून ते तलावापर्यंत उद्योग खात्री योजनेमध्ये सुमारे 26 लाखाच्या निधीचा उपयोग करून कच्चा रस्ता केला आहे. हा रस्ता करताना रोहयोतील मजूर न लावता जेसीबी, ट्रॅक्टर, टिप्पर व इतर मशिनरी लावून काम केले आहे. सर्व नियम धाब्यावर ठेवून निधीचा गैरवापर करण्यात आला आहे, असे निवेदन जिल्हा पंचायतीला दि. 10 जानेवारी 2024 रोजी देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा पंचायतीने चौकशी करण्यासाठी जिल्हा ओम्बूडसमनकडे तक्रार करण्यात आली व तालुका पंचायत अधिकऱ्यांना याबाबत तक्रारदार व ग्राम पंचायतकडील पुरावे घेऊन या घटनेचा पंचनामा करून सर्व पुरावे ओम्बुडसमनकडे पाठवावे, असा आदेश करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा यापूर्वी दि. 10 सप्टेंबर 2024 रोजी तालुका पंचायत अधिकारी बी. डी कडेमणी अधिकाऱ्याने प्राथमिक तपास केला होता. त्यानंतर पुन्हा ग्राम पंचायत विकास अधिकारी एन. ए. मुजावर यांना सविस्तर अहवाल देण्याची सूचना केली होती. मात्र अहवाल पूर्णपणे प्राप्त झाला नसल्यामुळे ओम्बुडसमन न्यायालयात कागदपत्रांअभावी तारखाच पडू लागल्या. त्यामुळे पुन्हा कागदपत्रे हाताळण्यासाठी खुद्द तालुका पंचायत अधिकारी बी. डी कडेमनी व अभियंता मुर्गेश यकांची यांनी गुरुवार दि. 27 रोजी ग्राम पंचायतीला भेट दिली. यावेळी पुन्हा सर्व कागदपत्रांची हाताळणी करून संपूर्ण अहवाल तयार करण्यासची सूचना पीडीओंना दिली.
येत्या गुरुवार दि. 3 एप्रिल रोजी रोहयोतील त्या कामातील सर्व कमगारांना उपस्थित राहण्याची सूचना केली. व तक्रारदार शिवपुत्र मैत्री व ग्राम पंचायतकडील दोन्ही पुरावे घेऊन ओम्बुड्समन न्यायालयात सादर करण्याचे सांगितले व पुढील कारवाई न्यायालयात होणार असल्याचे कडेमणी यांनी सांगितले. यावेळी तक्रारदार शिवपुत्र मैत्री, पीडीओ एन. ए. मुजावर, ग्रा. पं. अध्यक्ष अमृत मुद्देनावर, उपाध्यक्ष शोभा कुरेनावर सदस्य अपयगौडा पाटील, भैरू कंग्राळकर, लक्ष्मी सनदी, निगवा पाटील व सेक्रेटरी पुंडलिक कुरबेट आदी उपस्थित होते.