कापूस, तूरसह पिकांच्या नुकसानीची पाहणी
केंद्रीय पथकांचा राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेट : शेतकऱ्यांशी संवाद
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके राज्याच्या दौऱ्यावर आली आहेत. ही पथके 6 ऑक्टोबरपर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीसह परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणार आहेत. त्यानंतर केंद्र सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे. या पाहणीसाठी अधिकाऱ्यांची एकूण तीन पथकांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अजित कुमार साहू यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या पथकाने तुमकूर, चित्रदुर्ग, दावणगेरे आणि विजयनगर जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे. दुसरे पथक साहाय्यक आयुक्त डॉ. सुधांश भाग यांच्या नेतृत्वाखाली असून हे पथक हासन, म्हैसूर, चामराजनगर आणि मंड्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची पाहणी करत आहे. तर संचालक डॉ. मनसिंग यांच्या नेतृत्वाखालील तिसरे पथक यादगिरी, रायचूर, बागलकोट आणि कोप्पळ जिल्ह्यांना भेट देऊन पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहे.
हासन जिल्ह्यात पोहोचलेल्या डॉ. सुधांश भाग यांच्या पथकाने दुद्दा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. तर सोमवारी बाणावरसह अन्य भागांमध्येही हे पथक भेट देणार आहे. यापूर्वी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने जिल्हाधिकारी लता कुमारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती घेतली.
दरम्यान, अजित कुमार साहू यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथक दावणगेरे येथे दाखल झाले असून सोमवारी दावणगेरे, न्यामती आणि होन्नाळी तालुक्मयांतील विविध गावांना भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी करणार आहे. पथकाने दावणगेरे येथे मुक्काम केला असून जिल्हाधिकारी गंगाधरस्वामी यांच्यासह अन्य अधिकारी पथकासोबत उपस्थित राहून आवश्यक माहिती देणार आहेत.
डॉ. मनसिंग, पार्ता पाल आणि राकेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने यादगिरी जिल्ह्यालाही भेट दिली. शहापूर तालुक्मयातील विविध गावांमध्ये पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाअभावी नुकसान झालेल्या कापूस, तूर आणि इतर पिकांची पाहणी केली. पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांकडून घेण्यात आली. यादगिरीचे जिल्हाधिकारी राहुल पांडे हेही पथकासोबत उपस्थित होते.
ाामराजनगर जिल्ह्यातही डॉ. सुधांश भाग यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून पीक नुकसानीची पाहणी करण्यात येणार आहे. सोमवारी चामराजनगर तालुक्मयातील केरेहळ्ळी, गुंडलुपेट तालुक्मयातील निटे, सोमनहळ्ळी आणि राघवापूर या भागांना पथक भेट देणार आहे. त्यानंतर हनूर तालुक्मयातील विविध भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात येणार आहे. केंद्रीय पथकांच्या या पाहणीनंतर राज्यातील दुष्काळाची तीव्रता, पीक नुकसान आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.
