पालकमंत्र्यांकडून भरपावसात बळ्ळारी नाल्याची पाहणी
येडियुराप्पा रोडवर दाखल; मात्र दमदार पावसामुळे तातडीने माघारी
बेळगाव : बळ्ळारी नाल्यातील गाळ आणि जलपर्णीमुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकऱ्यांचे दरवर्षीच मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या नाल्याची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मंगळवारी झालेल्या दमदार पावसामुळे केवळ येडियुराप्पा मार्गावरूनच पाहणी केली. धामणे रोडवर बळ्ळारी नाल्याला भेट देणार होते. मात्र पावसामुळे त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला. बळ्ळारी नाला हा शेतकऱ्यांना दरवर्षीच मारक ठरला आहे. दमदार पाऊस झाल्यानंतर बळ्ळारी नाला परिसरातील हजारो एकर जमिनीतील पिके पाण्याखाली जात आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. या नाल्याचा प्रश्न निकालात काढावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे शेतकरी करत आहेत. मात्र आतापर्यंत त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी दरवर्षीच शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांनी त्याची दखल घेतली. मंगळवारी धामणे येथील रस्त्यावर जाऊन बळ्ळारी नाल्याची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पावसामुळे त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला. पुन्हा लवकरच तेथे जाऊन पाहणी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. येडियुराप्पा मार्गावरून त्यांनी पाहणी केली. याबाबत पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा करून स्वच्छता करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावेळी आमदार राजू सेठ, म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, वडगाव कृषी पत्तीन सोसायटीचे चेअरमन अमोल देसाई, शेतकरी संघटनेचे कीर्तीकुमार कुलकर्णी, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, माधुरी बिर्जे यांच्यासह इतर अधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.