For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री सतीश जारकीहोळींकडून भर पावसात 32 विविध कामांची पाहणी

06:22 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंत्री सतीश जारकीहोळींकडून भर पावसात 32 विविध कामांची पाहणी
Advertisement

त.भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : रविवारी सतत बरसणाऱ्या पावसातही सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी विविध कालव्यांना भेटी देऊन पाहणी केली. राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच मंत्री जारकीहोळी यांनी जलसिंचन व्यवस्थेला प्राधान्य दिले.

हुक्केरी तालुक्यातील हिडकल धरणाच्या उजव्या कालव्याला भेट देऊन पाहणी केल्यानंतर कालव्याद्वारे शेतकऱ्यांना मुबलक पाणीपुरवठा तसेच सिंचन कामाच्या प्रगतीची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळविली. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाण्याची कमतरता भासणार नाही, याची काळजी घेऊन उपक्रम हाती घेण्याची सूचना केली. सिंचन व्यवस्था आणखी सक्षमपणे राबविण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.

Advertisement

शनिवारी यरगट्टी तालुक्यातील कोडलीवाड, गोकाक तालुक्यातील कौजलगी (जीआरबीसी मुख्य कालवा), रायबाग तालुक्यातील मुगळखोड चौकी (जीएलबीसी मुख्य कालवा) तसेच रायबाग-मेखळी तलावाला भेट देऊन पाहणी केली होती. तद्नंतर, रविवारी सकाळी हिडकल धरणाच्या उजव्या कालव्याजवळील गोडचिनमलकी, घोडगेरी, मेलमट्टी कालव्यांना भेटी देऊन कालव्यातून पाणी वाहून जाण्याचे प्रमाण, देखभाल, दुऊस्तीसाठी करणे आवश्यक असलेला भाग व शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थितपणे पोचविणे याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दुऊस्ती आवश्यक असणाऱ्या भागात काम त्वरित हाती घेण्याची सूचनाही केली.

धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी कालव्यातील गाळ काढणे, जंगल कटिंग यासारखी कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच कालव्यांतर्गत शेवटच्या भागापर्यंतच्या शेतीला पाणीपुरवठा करण्यात यावा. यंदा पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे मेठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. कालव्याच्या पाण्यावरच अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून अधिकाऱ्यांनी जबाबदारीने पुढील कामे हाती घ्यावीत, अशी सूचना केली.  यावेळी स्थानिक शेतकरी नेत्यांनी मंत्री जारकीहोळी यांचा सत्कार केला. अधीक्षक अभियंता मुकुंद पेडणेकर, कार्यकारी अभियंता एच. एस. काखंडकी, सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन एच. जे. व मंजुनाथ होसमनी, नेते निंगाप्पा कुरबेट, शिवू पाटील, अशोक खंडरट्टी. सुधाकर शेट्टी, बसवराज पाटील, शिवू मुगळी यांच्यासह जलसिंचन खात्याचे अधिकारी व शेतकरी उपसस्थित होते.

Advertisement
Tags :

.