जेन झी च्या अंतरंगात...
अगदी कांही दिवसांपूर्वी पूर्वाश्रमीचे शिक्षक व आताचे मेंदू विज्ञान संशोधक डॉ. जेरेड कुनी हॉरवर्थ यांनी अमेरिकन सिनेट पुढे एक संशोधन अहवाल सादर केला. त्यात त्यांनी जेन झी पिढीचा बुद्ध्यांक मागील पिढ्यांपेक्षा कमी होत चालल्याचा निष्कर्ष मांडला आहे. तब्बल 80 देशांतील जेन झींचे परिक्षण करून परिश्रमपूर्वक तयार केलेल्या अहवालाने व त्यातील निष्कर्षांनी जागतिक पातळीवरील तरूणाई, पालक व शिक्षक वर्गात बरीच खळबळ माजवली आहे. ‘देशाचे किंवा जगाचे भविष्य तरूण पिढीच्या हातात आहे’ असे थोरामोठ्यांनी म्हटले आहे. अशा स्थितीत बुद्ध्यांक कमी असलेल्या तरूण पिढीच्या हाती ते कितपत सुरक्षित आहे हा कळीचा प्रश्न बनतो. आणि म्हणूनच हॉरवर्थ निष्कर्षाच्या अनुषंगाने जेन झी पिढीच्या अंतरंगाचा आढावा घेणे अगत्याचे ठरते.
पिढ्यांचे अस्तित्व, महत्त्व आणि नामकरण
जनरेशन झेड अर्थात ‘जेन झी’ हा शब्द सर्वप्रथम अमेरिकेत प्रचलीत झाला. आज तारूण्यात असलेल्या पिढीचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. काही स्त्राsत 1997 ते 2012 या कालावधीत जन्मलेल्यांचा दाखला देत जेन झीचे अस्तित्व प्रमाणित करतात. या जेन झीचे सन्माननिय सदस्य म्हणजेच आपली मुले, नातवंडे यांचे जीवन 2007 ची जागतिक महामंदी, कोव्हीड-19, व्यापार युद्ध, दहशतवाद, डीजीटल तंत्रज्ञान, एआयचे आगमन अशा नानाविध गोष्टींनी प्रभावित झाले आहे. नव्या पिढीचे जेन झी हे नामकरण सातत्याने कानावर पडते. याचा अर्थ जागतिकीकरणानंतरची माहिती व संपर्काची तीव्रत्तम गती आणि त्याला मिळालेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार इतकाच आहे. अन्यथा, पिढी नामकरणाची प्रथा 19 व्या शतकाच्या उत्तरार्धातील म्हणजे दिडशे वर्षांइतकी जुनी आहे. महान फ्रेंच तत्वज्ञ आणि समाज विज्ञानाचे प्रवर्तक ऑगस्टे कॉम्टे यांनी म्हटले आहे की, ‘पिढ्यांमधील बदल हे सामाजिक बदलांमागील इंजिन आहे. विशेषत: प्रत्येक पिढी कमी जास्त प्रमाणात त्याच विशिष्ट काळात नव्या जीवन टप्यात प्रवेशते. हा असा दुवा असतो जो पुढे त्या काळातील समाजाचा इतिहास निर्माण करतो’ एखाद्या कालखंडात घडणारी वैशिष्ट्यापूर्ण व्यापक घटना संपूर्ण जागतिक पिढीचा दृष्टीकोन बदलू शकते. त्यावरून बऱ्याचदा त्या त्या काळातील पिढीचे नामकरणही प्रभावित झालेले दिसते. नामकरणाच्या हेतू अभ्यासातून आपल्या पूर्वज-वंशजांच्या वर्तन-व्यवहाराचा अर्थबोधही घडू शकतो. 1883 ते 1900 या काळात जन्मलेल्या पिढीने पहिल्या महायुद्धाचा दाहक अनुभव घेतला. तिचा जो भ्रमनिरास झाला. त्यावरून तिला ‘हरवलेली पिढी’ अर्थात लॉस्ट जनरेशन म्हटले जाऊ लागले. त्यानंतर 1901 ते 1927 दरम्यान जन्मलेल्या अनेकांनी दुसऱ्या महायुद्धात सैन्यात व आरोग्य आणि पुनर्निमाण क्षेत्रात मोठे योगदान दिल्याने तिला ‘सर्वोत्तम पिढी’ म्हणजे ‘ग्रेटेस्ट जनरेशन’ म्हटले गेले. पुढे 1928 ते 1945 या काळात जन्मास आलेल्या पिढीने महामंदी व दुसऱ्या महायुद्धातील बालपण अनुभवले. काटकसर व विलंबित समाधानाला महत्त्व दिले. महायुद्धाच्या परिणामांनी हादरलेली ही पिढी प्रतिक्रियावादी व बंडखोर नव्हती. दुसऱ्या महायुद्धानंतर 1946 ते 1964 मध्ये जी पिढी जन्मास आली ती बहुतांशी आजच्या जेन झीची आजी-आजोबा असू शकेल या पिढीत एक अपवादात्मक असे रानटी तरूणपण होते. ही पिढी लोकसंख्या वाढवण्यास कारणीभूत झाली. त्यावरून तिला अपत्ये वाढवणारी अर्थात बेबी बुमर्स पिढी म्हटले गेले. पुढे 1965 ते 1980 दरम्यान जन्मलेल्या पिढीला ‘मध्यम मूल पिढी’ किंवा जनरेशन एक्स म्हटले गेले. प्रथमच बाजारात आलेल्या गर्भनिरोधक गोळीमुळे लोकसंख्या घटताना ही पिढी जन्मली. सामाजिक दबाव, पैसा किंवा दर्जाची काळजी करू इच्छित नसलेल्या लोकांचे वर्णन करण्यासाठी एका अमेरिकन पुस्तकात ‘एक्स’ हा शब्द प्रतिकात्मकरित्या वापरला. त्यावरून एक्स जनरेशन शब्द रूढ झाला. यातील बहुसंख्य आताच्या जेन झीचे आई-बाप असू शकतात. बेबी बूमर्स पालक मुलांना रस्त्यावर दिवे लागेपर्यंत बाहेर राहू देत. एक्स पिढीच्या पालकांनी मात्र सातच्या आत घरात हा नियम लागू केला. ते मुलांचे काळजीवाहू पालक बनले. यानंतर 1981 ते 1996 मध्ये जन्म घेतलेली पिढी म्हणजे सहस्त्राब्दी पिढी’. मिलेनियल्स किंवा जनरेशन वाय अशी तिची ओळख आहे. जागतिकीकरणाचा विस्तार होताना आणि सहस्त्रकाचा अंत होताना जन्मलेल्या या पिढीस वाढतानाच संगणक, स्मार्ट फोन्स इत्यादी तंत्रवैज्ञानीक लाभ मिळाले. 9/11 चा दहशतवादी हल्ला, चिनी वस्तुंचा बोलबाला, दुरदर्शन वाहिन्यांचा सुळसुळाट, अॅमेझॉन खरेदी या ऐतिहासिक स्थित्यंतराच्या काळात सहस्त्राब्दी पिढी वाढली. पर्यावरण, राजकारण, आर्थिक नियोजनाबाबत सजग पिढी म्हणून तिला नावाजले गेले. वाय जनरेशननंतर येते ती ‘जनरेशन झेड’
जेन झी पिढीची वैशिष्ट्यो
जन्मानंतर खेळण्यांऐवजी स्मार्ट फोन्स, संगणक, डिजीटल माध्यमे, गुगल मॅप या सारख्या युगप्रवर्तक तंत्रज्ञानाच्या सहवासात मोठी झालेली जेन झी पिढी त्याच्या वापरात इतकी प्रविण आहे की, तिच्या पालकांना आपण खूपच मागास व बावळट आहोत असा गंड निर्माण व्हावा. परिणामी, जेन झीच्या पालकांना आधुनिकता हाताळण्यासाठी त्या आधी कोणत्याही काळात नसेल इतके आपल्या युवा अपत्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. बऱ्याच पिढ्यानंतर असे नवल पहिल्यांदाच घडते आहे की, बापाने मुलाला ‘ए शहाण्या’ म्हणून धडे देण्याऐवजी मुलगाच बापाला ‘कसे हो तुम्ही’ म्हणत आधुनिक तंत्रज्ञान वापराचे डोस पाजवून त्याच्यात न्यूनगंड निर्माण करताना दिसत आहे. आपल्या आधीच्या पिढ्या खूपच मागे आहेत. त्यांना काहीच पटकन कळत नाही. असा शांत आत्मविश्वास जेन झींच्या चेहऱ्यांवर नेहमीच विलसत असतो. जेन झी काम आणि जीवनातील संतुलनाला महत्त्व देतात. वैयक्तीक मूल्यांशी व ध्येयांशी जुळणाऱ्या नोकऱ्या शोधतात. थांबणे माहीत नसल्याने झपाट्याने नोकरी बदल त्यांचे वैशिष्ट्या आहे. समता, विविधता व सर्वसमावेशकता या सामाजिक मूल्यांकडे ही पिढी सध्यातरी व्यापक आणि सुक्ष्म दृष्टीकोनातून पाहते. जेन झींच्या आयुष्यात समाज माध्यमे मोठी भूमिका बजावतात, त्यांची मते बनवतात. केवळ स्क्रोलींग व स्वाईपसाठी मर्यादीत वापर न करता या माध्यमांच्या संपर्कात राहण्यावर ही पिढी अवलंबून आहे. पॉडकास्ट, गेमिंग, चॅट जीपीटी, गुगल मॅप यांचा मोठा वापर ती करते. उत्तम आर्थिक साक्षरतेमुळे गुंतवणूक बचत, आर्थिक भविष्यासंदर्भात जेन झी सजग आहे. या पिढीचे आणखी एक विशेष म्हणजे मद्यपानासाठी ती फारशी उत्सुक नाही.
गॅलप सर्वेक्षण दर्शवते की, अमेरिकेतील 18 ते 34 दरम्यानचा तरूण वर्ग दोन दशकांपूर्वीच्या याच वयोगटातील तरूणांपेक्षा खुपच कमी मद्यपान करतो. 2000 च्या दशकात या वयोगटातील मद्यपींची संख्या 72 टक्के होती आज ती 60 टक्यांवर आहे. हीच गोष्ट तंबाखू सेवनाच्या बाबतीतही दिसून आली आहे. विवाह हे जीवनातील खूपच महत्त्वाचे ध्येय आहे. असे जेन झीस वाटत नाही.
कमी बुद्ध्यांक चिंताजनक
जेन झींच्या बाबतीत बरेच काही मनोहर असले तरी तिचा बुद्ध्यांक (आयक्यू) कमी असणे ही उदास करणारी बाब आहे. जेन झी संदर्भातील अहवालात डॉ. हॉरवर्थ नमूद करतात, ‘गेल्या दिडशे वर्षानंतर पहिल्यांदाच एखाद्या पिढीचा बुध्द्यांक, स्मरणशक्ती, लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता, वाचन, गणित आणि समस्या सोडवण्याची बौद्धिक क्षमता मागील पिढीपेक्षा कमी झाली आहे. मानवी मेंदू लहान चित्रफीत किंवा संक्षिप्त वाक्यांतून शिकण्यासाठी बनलेला नाही. सखोल छापिल वाचन व समोरासमोर जिवंत संवाद यातून माणूस अधिक चांगले शिकतो. संगणक किंवा मोबाईल पडद्यांवरून नाही मोबाईलसह सर्व प्रकारच्या स्क्रीन वापरामुळे 2010 नंतर मुलांची बौद्धिक क्षमता घटत आहे. युनेस्को अहवालाने डॉ. हॉरवर्थ यांच्यासारखाच इशारा देताना म्हटले आहे की, जेन झीची सर्वात कमकुवत बाजू म्हणजे त्यांचा अतिआत्मविश्वास जेन झी तरूणाई आपल्या बुद्धिमत्तेच्या गरजेपेक्षा अधिक आत्मविश्वासी आहे. तिला आपल्या मर्यादांची जाणीव नाही. इतर काही तज्ञांनी मोबाईल, टॅब्लेट, टीव्ही, संगणकाच्या अतीवापराने निर्माण होणारे आभासी स्वमग्नतेचे (व्हर्च्युअल ऑटिझम) धोके अधोरेखित केले आहेत. बुद्ध्यांकातील कमतरता जेंव्हा एका पिढीत विस्तारत पुढे व्यापक बनत जाते आणि पुढील पिढ्या तसेच मार्गक्रमण करतात, तेंव्हा समाज, देश आणि जगासाठी समस्या निर्माण होतात. एआयच्या आगमनाने बुद्ध्यांक समस्या आणखी सखोल होऊ शकते. सामाजिक शैथिल्य आणि आळस निर्माण होतो. आंधळेपणाने माहिती स्विकारून कृती करणाऱ्या अंधभक्तांच्या टोळ्या निर्माण होतात. कट्टरतावाद, कठोर मते ध्रुवीकरण फोफावते. विश्लेषण, समीक्षा, प्रतिक्रिया, विवेक, चिकित्सा हे सारे अस्तंगत होते. वाचन आणि हातानी लिहिण्याची सवय लावून घेण्याचा मुद्दा डॉ. हॉरवर्थ यांनी आपल्या अहवालात ठासून मांडला आहे. ते म्हणतात, स्वतंत्र संशोधन सातत्याने हे दर्शवते की, वाचन, आकलन व धारणा स्क्रीनपेक्षा कागदावर अधिक मजबूत असतात. विशेषत: जटील वा विस्तारीत मजकुरासाठी कागदच उपयुक्त ठरतो.
- अनिल आजगांवकर