काकती परिसरात सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव
रयत संपर्क केंद्रातून सवलतीत किटकनाशकांचा पुरवठा करण्याची मागणी
वार्ताहर/काकती
हळ्ळेहोसूर, भुतरामहट्टी, ईरणभावी, गंगेनळ, मण्णिकेरी, शिवापूर आदी भागात सोयाबीन पिकावर पाने व शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने पीक धोक्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत किडीच्या अळ्यांनी आर्थिक नुकसान पातळी गाठलेली नसली तरी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. उपाययोजना न केल्यास येत्या पंधरवड्यात सोयाबीनचे पीक वाया जाऊ शकते. काकती रयत संपर्क केंद्रातून सवलतीत किटकनाशकांचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात सतत रिमझिम झालेल्या पावसाने जमिनीत अधिक पाणी झाल्याने सखल भागातील पीक कुजून खराब झाले. गेल्या 25 दिवसांत ढगाळ हवामान आणि संततधार पडणारा पाऊस अशा वातावरणात पाने, शेंगा खाणाऱ्या अळ्याचे प्रमाण वाढले आहे. अनुकूल वातावरण मिळाल्याने कीड खावून पानाच्या जाळ्या झाल्या आहेत. पाने मुरठून पिवळी पडत आहेत. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी खासगी दुकानातून खरेदी करून किटकनाशकाची फवारणी केली आहे. प्रत्यक्षात रयत केंद्रात औषधांचा साठा संपला असल्याचे सांगितले जात आहे. सोयाबीन पिकाच्या निगराणीवर भर देण्यासाठी त्वरित औषधांचा साठा उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे.