For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इनसॅट-3डीएस’ अंतराळ झेपेसाठी सज्ज

06:36 AM Feb 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘इनसॅट 3डीएस’ अंतराळ झेपेसाठी सज्ज
Advertisement

श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून आज होणार प्रक्षेपण

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

‘इनसॅट-3डीएस’ या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची सर्व सज्जता झाली आहे. आज शनिवारी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून या उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण केले जाणार आहे. जीएसएलव्ही-एफ 14 या अग्निबाणाचे हे 14 वे अभियान असेल. हा उपग्रह तिसऱ्या पिढीतील तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement

हा हवामानविषयक उपग्रह आहे. तो अवकाशात भूस्थिर कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या  खर्चाचा सारा भार केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान विभागाने उचलला आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी त्याचे प्रक्षेपण केले जाईल, अशी माहिती इस्रोने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आहे.

या वर्षातील दुसरे अभियान

इस्रोचे हे या वर्षातले अशा प्रकारचे दुसरे अभियान असेल. 1 जानेवारीला एक्स्पोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करत संस्थेने नूतन वर्षाचा प्रारंभ धडाकेदार पद्धतीने केला होता. 2013 मध्ये इनसॅट-3डीएस उपग्रहाच्या प्रथम आवृत्तीचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्या उपग्रहाच्या सेवेत खंड पडू नये यासाठी हा नवा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे, अशीही माहिती देण्यात आली.

अनेक विभागांसाठी उपयुक्त

हा नवा उपग्रह भारत सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या अनेक विभागांसाठी साहाय्यभूत ठरणार आहे. पृथ्वी विज्ञान विभाग, भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय सागर तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय हवामान सर्वेक्षण संस्था आणि भारतीय सागर माहिती सेवा केंद्र इत्यादी संस्थांना या उपग्रहाने धाडलेली माहिती उपयोगी ठरणार आहे. विशेषत: पावसाचे अनुमान अधिक अचूकपणे नोंदविता येणार आहे.

उद्योगांचे विशेष योगदान

या अत्याधुनिक उपग्रहाच्या निर्मितीसाठी भारतातील अनेक खासगी उद्योगांनीही त्यांचे महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या उपग्रहाचे अनेक जटील भाग या उद्योगांनी निर्माण केले आहेत. या उपग्रहातील अनेक महत्वाच्या ट्रान्स्पाँडर्सची निर्मिती विविध उद्योगांनी करुन दिली आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.