समुद्रातील बचावकार्यात भारतीय नौदलाची ताकद वाढली; ‘आयएनएस निपुण’ ताफ्यात दाखल
मुंबई : अथांग समुद्रात संकटात सापडलेल्या पाणबुडीपर्यंत पोहोचून तातडीने बचावकार्य करण्याची भारतीय नौदलाची क्षमता आता आणखी बळकट झाली आहे. खोल समुद्रातील डायव्हिंग, पाण्याखालील हस्तक्षेप तसेच पाणबुडी बचावकार्यासाठी सज्ज असलेली ‘आयएनएस निपुण’ ही निस्तार वर्गातील दुसरी डायव्हिंग सपोर्ट वॉरशिप सोमवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली.
मुंबईतील नौदल गोदीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात नौदलप्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांच्या हस्ते ‘आयएनएस निपुण’चा औपचारिकरीत्या नौदलात समावेश करण्यात आला. नौकेवर भारतीय नौदलाचा ध्वज फडकवताच तिने अधिकृतपणे कार्यरत सेवेत प्रवेश केला.
या सोहळ्याला नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वजाधिकारी कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ॲडमिरल संजय वात्सायन, नौदलातील वरिष्ठ अधिकारी, हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी, माजी नौदल अधिकारी, मान्यवर तसेच नौकेच्या चमूच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.
स्वदेशी तंत्रज्ञानातून युद्धनौकेची निर्मिती
‘आयएनएस निपुण’ची स्वदेशी रचना आणि बांधणी विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या नौकेच्या समावेशामुळे भारताची जटिल आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत युद्धनौका देशातच विकसित व बांधण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे.
पाणबुडी बचावकार्यात महत्त्वाची भूमिका
समुद्राच्या खोल भागात अडचणीत सापडलेल्या पाणबुड्यांपर्यंत पोहोचणे आणि आवश्यक त्या ठिकाणी पाण्याखालील बचावकार्य करणे हे अत्यंत आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत खोल समुद्रातील डायव्हिंग, अंडरवॉटर इंटरव्हेन्शन आणि सबमरीन रेस्क्यू ऑपरेशन्ससाठी ‘आयएनएस निपुण’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
निस्तार वर्गातील या जहाजाच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या पाण्याखालील बचाव आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमतेत वाढ झाली असून, समुद्रातील विविध आव्हानात्मक मोहिमांसाठी नौदल अधिक सक्षम झाले आहे.