बेंगळूरमधील वृद्धेच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणी बेळगावातही चौकशी
वृद्धेला 24 कोटींचा तर बेळगावातील वृद्धाला 15 कोटींचा गंडा प्रकरण
बेळगाव : डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून बेंगळूर येथील एका वृद्धेला 24 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या सहा जणांच्या टोळीला बेंगळूर येथील सायबर क्राईम विभागाने अटक केली असून दोन महिन्यांपूर्वी बेळगावात घडलेल्या डिजिटल अरेस्ट प्रकरणातही या टोळीचा सहभाग आहे का? याची पडताळणी करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात आजवरचे सर्वात मोठे डिजिटल अरेस्टचे हे प्रकरण आहे. बेंगळूर येथील 74 वर्षीय वृद्धेला तब्बल अडीच महिने डिजिटल अरेस्ट करून तिच्याकडून 24 कोटी रुपये हडप करण्यात आले आहेत. गुन्हेगारांनी आणखी पैशांची मागणी केल्यामुळे ही वृद्धा बँकेत सोने तारण ठेवण्यासाठी गेली असता बँक व्यवस्थापकाच्या जागरुकतेमुळे सर्वात मोठा प्रकार उघडकीस आला आहे.
दुबईत शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या शिवाजीनगर, बेंगळूर येथील लक्ष्मी राममूर्ती (वय 74) यांना ठकविण्यात आले आहे. सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहमदाबाद येथील पलकभाई पटेल, अमित नरेंद्र पटेल, बिहारचा गौरवकुमार, महाराष्ट्रातील अक्कच मलिक, नवी दिल्लीचा ओमप्रकाश रजपूत, तामिळनाडूचा एन. शिवगनानम या सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्या बँक खात्यांतील 4 कोटी रुपये गोठविण्यात आले आहेत तर 1 कोटी 45 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. बेळगाव येथील वृद्ध उद्योजकाला 7 फेब्रुवारी 2026 ते 9 मार्च 2026 या वेळेत 15 कोटी 45 लाख रुपयांना डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून गंडविण्यात आले होते.त्याच काळात बेंगळूर येथील प्रकारही घडला आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी लक्ष्मी यांना सायबर गुन्हेगारांचा पहिल्यांदा फोन आला. दहा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 26 व्यवहारातून 24 कोटी रुपये जमा करून घेण्यात आले आहेत. सध्या अटकेत असलेल्या सहा जणांच्या बँक खात्यांचा वापर ही रक्कम हडप करण्यासाठी करण्यात आला आहे.
81 वर्षीय वृद्ध उद्योजकाला 5 फेब्रुवारी रोजी व्हॉट्सअॅप कॉल करून आम्ही सीबीआय डायरेक्टर बोलतो. मनी लाँड्रींग केसमध्ये तुमचा सहभाग आहे, असे सांगत त्यांना 15 कोटी 45 लाख रुपयांना गंडविण्यात आले होते. बेंगळूर येथील वृद्धेलाही मनी लाँड्रींग केसमध्ये तुमचा सहभाग असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रान्सफर करून घेण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांत साम्य असल्यामुळे बेळगाव येथील फसवणूक प्रकरणातही या गुन्हेगारांचा सहभाग आहे का? याची पडताळणी करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यापूर्वीही बेळगाव येथील सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील व्यंकदूत नाईक, श्रीपाद नाईक यांना अटक केली होती. पोलिसांनी 2 कोटी रुपये जप्त केले होते. आता बेंगळूर प्रकरणातील गुन्हेगारांच्या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होणार आहे, हे चौकशी पूर्ण झाल्यानंतर उघडकीस येणार आहे.