द. आफ्रीका खंडातील अभिनव उपक्रम
अॅफ्रिलॅब्स नामक एक चतुरस्त्र, नाविन्यपूर्ण आणि लक्ष्यकेंद्रीत संस्था गेल्या दशकापासून आफ्रिका खंडास उद्योग व व्यवसाय केंद्र बनविण्यासाठी झटत आहे. गुलामगिरी, वसाहतवाद, विस्तृत अरण्ये, उष्ण तापमान यासारख्या अनेक कारणांमुळे जगातील मागासलेला खंड मानल्या गेलेल्या या खंडाचे उद्योग, व्यवसाय आणि व्यापार विषयक स्वरूप बदलण्याचा आणि आफ्रिकन नागरिकांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा चंग या संस्थेने बांधला आहे.
आफ्रिका खंडातील बहुतेक देश आयातीवर अवलंबून असलेले देश आहेत. उत्पादन आणि सेवा क्षेत्रात ते पिछाडीवर आहेत. प्रचंड गरिबी, दुष्काळ, आरोग्य व्यवस्थेची वानवा यांचा सामना या खंडातील नागरिक वर्षानुवर्षे करीत आहेत. भरीस भर म्हणून सततची युध्दे, यादव्या, सत्तापालट यामुळे अनेक देश अस्थिर आहेत. या पार्श्वभूमीवर या साऱ्याचे मूळ कारण असलेल्या अर्थकारणास गती देत आफ्रिकेस पाश्चात्य देशांप्रमाणे प्रगतीशील आणि बऱ्याचअंशी स्वावलंबी बनविण्याचा
अॅफ्रिलॅब्सचा उद्देश आहे.
अॅफ्रिलॅब संस्थेचा प्रवास 2011 पासून सुरू झाला. त्यावेळी चार आफ्रिकन देशातून केवळ पाचजण या संस्थेचे सदस्य होते. आज 54 आफ्रिकन देशातून 435 सदस्य झाले आहेत. क्षमता निर्मिती, धोरण विषयक सल्ला, अभिनव पध्दतीची आर्थिक मदतीची प्रारूपे आणि मोठ्या प्रमाणात महिला सबलीकरण हे धोरण ठेऊन या संस्थेची वाटचाल सुरू आहे. आफ्रिकेत जेथे जेथे संस्था केंद्र आहेत तेथे तंत्रवैज्ञानिक प्रशिक्षण, उद्योग, कायदा, पतपुरवठा या सारख्या विषयात बहुमोल सल्ले, आर्थिक पाठिंब्याची तरतूद करण्यासाठी उद्योग जगतात ती प्रसिध्द आहेत. रोजगार निर्मितीची केंद्र व्यवस्था म्हणूनही आफ्रिकेत अॅफ्रिलॅबने लोकप्रियता मिळवली आहे.
कोणताही व्यवसाय, उद्योग निर्माण करण्यासाठी वित्तपुरवठ्याची गरज असते. या साठी अॅफ्रिलॅबने ‘उत्प्रेरक आफ्रिका कार्यक्रम’ नावाची एक योजना सुरू केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विविध भागीदारांकडून निधी मिळवला जातो. तो एका ठिकाणी संचयीत झाल्यानंतर
अॅफ्रिलॅब पुरस्कृत स्टार्टअप्स उद्योगांसाठी सह गुंतवणूक, वित्त पुरवठा या माध्यमातून वापरला जातो. या कार्यक्रमाद्वारे अभिनव औद्योगिक कल्पना घेऊन येणारे तरूण, नूतनीकरण करू पाहणारे व्यावसायिक यांना बँकात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांकडून निधीची सोय करून दिली जाते. याद्वारे ठिकठिकाणी औद्योगिक पर्यावरणाची निर्मिती होण्यास उत्तेजन दिले जाते. या अॅफ्रिलॅब्स केंद्राद्वारे सुरू होणाऱ्या नव्या उद्योगांनी केवळ निधी मिळवला नाही तर आफ्रिकेच्या आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण करण्यात यश मिळवल्याचे आकडेवारी सांगते.
जेंव्हा एखादा प्रदेश मागास असतो तेंव्हा त्या प्रदेशातील महिला पुरूषांच्या तुलनेत अधिक मागास असतात. अॅफ्रिलॅबने हे जाणले की आपल्या खंडात आदिवासीकरण झालेल्या महिलांची संख्या मोठी आहे. कोणताही उद्योग, व्यवसाय असो तेथे पुरूषांची संख्या महिलांपेक्षा खूपच अधिक आहे. हे जाणून तांत्रिक आणि अन्य उद्योगात महिलांना प्रशिक्षित करून, उत्तेजन देऊन महिला उद्योजक घडवण्याचे कार्य हाती घेण्यात आले. यासाठी व्हिसा फाऊंडेशन या समुहाशी भागीदारी करण्यात आली. संपूर्ण आफ्रिकेत 50 हजार महिलांनी चालविलेले उद्योग निर्माण करण्याचे ध्येय ठरविण्यात आले असून त्या दिशेने पाऊले टाकण्यात आली. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या या महिलांसाठीच्या योजनेचा पाच देशातील, दहा शहरातील 500 महिला उद्योजकांना लाभ मिळत आहे. 10 महिला चालविणाऱ्या उद्योगात संस्थेतर्फे 10 हजार डॉलर्स घालून आणि उद्योग मार्गदर्शनासाठी संयत्रणा तयार करीत परस्परसंबंधी महिला उद्योगांचे जाळे संपूर्ण आफ्रिका खंडात उभारण्याचे प्रयत्न अॅफ्रिलॅब करीत आहे. विशेष म्हणजे महिला उद्योजकांसाठी महिला सल्लागार, मार्गदर्शक, प्रशिक्षक नेमून हे आगळे स्त्राr उद्योग विश्व उभारले जात आहे. या कामाची व्याप्ती झपाट्याने वाढताना दिसते.
अॅफ्रिलॅब्सने दोन वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमचा एक भाग म्हणून कार्यरत असलेल्या ‘अॅक्सलेरेटर लॅब्स’ या नामांकीत संस्थेस भागीदार बनवले आहे. याप्रसंगी बोलताना संस्थेचे कार्यकारी संचालक अॅना एकेल्डो म्हणाले, आपल्याकडील युवकांची संख्या पुढील पाच वर्षात पाचशे दशलक्ष होण्याची शक्यता आहे. अशावेळी तरूणांना रोजगार मिळणे आवश्यक आहे. अॅक्सलेरेटर लॅब्सशी भागीदारी झाल्याने रोजगार निर्मितीचे लक्ष्य गाठण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. जागतिक युवा लोकसंख्येच्या आकडेवारीप्रमाणे पुढील 25 वर्षात आफ्रिका खंड हा जगातील मोठ्या तरूण लोकसंख्येचा खंड असेल. अशा काळात जर रोजगार उपलब्ध नसेल तर तरूणाई गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार, दंगली, व्यसनांधता अशा मार्गांकडे वळते. आफ्रिकेत आज अशांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर
अॅफ्रिलॅब्सच्या कार्याचे महत्त्व ध्यानी यावे. गेल्या
ऑक्टोबर महिन्यात रवांडा येथे अॅफ्रिलॅब्सचे वार्षिक संमेलन पार पडले. या संमेलनात ‘कार्य व्याप्तीच्या दिशेने आफ्रिकेचा चढता आलेख’ या विषयावर विविध देशांचे प्रतिनिधी, उद्योजक यांनी आपली मते मांडली. गेल्या दशकात आफ्रिकेने तंत्रवैज्ञानिक उद्योगात लक्षणीय कामगिरी पार पाडली आहे. विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पना उदयास येऊन त्यानुसार उद्योग उभारणी होत आहे. नायजेरिया, सेनेगल, ट्युनिशिया आणि केनिया या देशांनी ‘स्टार्टअप्स’ उद्योगात, लघू उद्योगात आपली कार्यकृती आणि क्षमता वाढविली आहे. यामुळे रोजगार निर्मिती वाढली असून गरिबी कमी झाल्याचे मत बऱ्याच मान्यवरांनी व्यक्त केले. दुर्दैवाने गेल्या महिन्यात सुरू झालेल्या हमास-इस्त्रायल संघर्षाकडे माध्यमांचे अधिक ध्यान असल्यामुळे जागतिक पातळीवर आफ्रिकेतील बदलांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या संमेलनाकडे स्वाभाविकपणे दुर्लक्ष झाले.
जागतिकीकरणानंतर साऱ्या देशांचा सारखाच विकास होईल असे या धोरणाच्या पुरस्कर्त्यांनी सांगितले होते. परंतू पाव शतकानंतर असे निदर्शनास आले की जागतिकीकरणाचा लाभ आधीच संपन्न असलेल्या मोजक्याच देशांना मिळाला. तुलनेत आशियाई आणि आफ्रिकन देशांची परिस्थिती सुधारली नाही. द. आफ्रिका खंडातील देशांना जागतिक संस्था, स्वयंसेवी संस्था, एनजीओज यांच्याकडून मदतीचा ओघ सुरूच राहिला. तेथील खनिज संपन्नतेवर आधारलेला खाण उद्योगही पाश्चात्य मालकांकडे राहिला आणि स्थानिक आफ्रिकन मजूर बनला. अशा परिस्थितीत स्वत:च पुढाकार घेऊन अॅफ्रिलॅब्स सारख्या माध्यमातून आफ्रिकेला संपन्नता आणण्यासाठी कोणी झटत असेल तर या कृतीचे स्वागत तर व्हायलाच हवे शिवाय अविकसीत देशात अनुकरणही व्हायला हवे.
- अनिल आजगावकर