कंटेनरच्या ठोकरीनंतर इनोव्हा कारला अपघात
जखमी चालकाची कित्तूर पोलिसात फिर्याद : सीसीटीव्ही फुटेज ताब्यात, हिट अॅण्ड रनचा गुन्हा
बेळगाव : भरधाव कंटेनरने सरकारी इनोव्हाला धडक दिल्याने महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आले असून कंटेनर चालकाविरुद्ध कित्तूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर आपले वाहन न थांबवता कंटेनर चालकाने तेथून पलायन केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बुधवारी यासंबंधी माहिती दिली आहे. मंगळवारी सकाळी पोलीसप्रमुखांसह बहुतेक जणांनी कुत्रे आडवे आल्याने इनोव्हाला अपघात झाल्याची माहिती दिली होती. मात्र, इनोव्हा चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून यासंबंधी हिट अॅण्ड रन प्रकरण दाखल करण्यात आले असून अपघातानंतर पलायन करणाऱ्या कंटेनर चालकाचा शोध घेण्यात येत आहे.
केए 01 जीए 9777 क्रमांकाच्या इनोव्हामधून बेंगळूरहून बेळगावला येताना मंगळवारी पहाटे अंबडगट्टी क्रॉसजवळ अपघात झाला होता. इनोव्हाची रस्त्याशेजारील झाडाला धडक बसून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (वय 49), विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी (वय 41), गनमॅन इराप्पा हुणशीकट्टी (वय 28) व चालक शिवप्रसाद गंगाधरय्या (वय 39) हे जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कंटेनर चालकाने सिग्नल न दाखवता आपला कंटेनर डाव्या बाजूला वळवला. त्यावेळी अपघात टाळण्यासाठी इनोव्हा चालकानेही आपली इनोव्हा डाव्या बाजूला घेतली. तरीही इनोव्हाच्या उजव्या बाजूला कंटेनरची धडक बसली. या ठोकरीनंतर चालकाचे नियंत्रण सुटून सर्व्हिस रोडशेजारील झाडाला इनोव्हाची धडक बसली, अशी माहिती इनोव्हा चालकाने दाखल केलेल्या फिर्यादीत दिली आहे. मंगळवारी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आदींनी कुत्रा आडवा आल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले होते. मात्र, या अपघातासंबंधी उपलब्ध झालेले सीसीटीव्ही फुटेज व इनोव्हा चालकाने दिलेल्या फिर्यादीनंतर कंटेनर चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून या अपघाताला कारणीभूत असलेल्या कंटेनरचा शोध घेण्यात येत आहे.