बिहारमध्ये शेतकऱ्यांशी राहूल गांधी यांचा संवाद; केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय : राहुल गांधी
वृत्तसंस्था/ पूर्णिया
महात्मा गांधींनी पूर्ण देशाला प्रेमासोबत जगण्याचा आणि सत्यासाठी लढण्याचा संदेश दिला आहे. गांधींनी दाखवून दिलेल्या मार्गावर आम्ही आज चालत आहोत असे उद्गार काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान बिहार येथे बोलताना मंगळवारी काढले आहेत. पूर्णिया येथे राहुल गांधी यांनी काही शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना राहुल यांनी बिहारी शैलीत पगडी बांधून संबोधन केले आहे. शेतकऱ्यांना सध्या चहुबाजूने घेरले जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेत अदानीसारख्या मोठ्या उद्योजकांना देण्यात येत आहेत. दुसरीकडे खते, बियाणे यासारख्या गोष्टींसाठी शेतकऱ्यांपासून पैसे घेतले जात आहेत. देशातील सर्व शेतकरी उभे ठाकल्याने केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले. शेतकरी हा देशाचा कणा असल्याचा माझे मानणे आहे. अब्जाधीशांची 14 लाख कोटी ऊपयांची कर्जे माफ झाली, मल्ल्या, अदानींचे कर्ज माफ होऊ शकते, मग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ होऊ शकत नाही असे प्रश्नार्थक विधान राहुल यांनी केले आहे.
द्वेष आणि हिंसेच्या विचारसरणीने महात्मा गांधींना देशापासून हिरावून घेतले होते. आज हीच मानसिकता आता गांधींच्या मूल्यांना आमच्यापासून हिरावून घ्रा पाहत आहे. द्वेषाच्या या वादळात सत्य आणि सद्भावनेची ज्योत विझू देऊ नये. हीच प्रत्यक्षात महात्मा गांधी यांना आमची खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे उद्गार राहुल यांनी काढले आहेत.