मार्क वूडसमोर दुखापतीची समस्या
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडला कोपराला झालेल्या दुखापतीची समस्या चांगलीच जाणवत आहे. या दुखापतीमुळे त्याला 2024 च्या उर्वरित क्रिकेट हंगामाला मुकावे लागणार आहे. अशी माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
यापूर्वी झालेल्या विंडीज विरुद्धच्या मालिकेत खेळताना मार्क वूडच्या उजव्या हाताच्या कोपराला ही दुखापत झाली होती. वैद्यकीय तपासणीत बोनस्ट्रेस अढळून आले. ही दुखापत बरी होण्यास काही कालावधी लागणार असल्याने तो चालू वर्षीच्या उर्वरित क्रिकेट हंगामात खेळू शकणार नाही. 34 वर्षीय मार्क वूडला अलिकडेच उजव्या पायाच्या मांडीचा स्नायूही दुखावला होता. सध्या सुरु असलेल्या लंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मार्क वूड पहिल्या सामन्यात खेळला होता पण त्याला गोलंदाजी करताना वेदना जाणवत होत्या. इंग्लंडचा संघ ऑक्टोबरमध्ये पाकच्या दौऱ्यावर तर डिसेंबर महिन्यात न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार असून हे दोन्ही दौरे वूडला हुकणार आहेत. 2025 च्या क्रिकेट मौसमामध्ये मार्क वूडचे पुनरागमन होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.