For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशियाई क्रीडा स्पर्धेतून जखमी तेजस शिर्से बाहेर

07:17 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
आशियाई क्रीडा स्पर्धेतून जखमी तेजस शिर्से बाहेर
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

ग्लास्गो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरूषांच्या 110 मी. अडथळ्याच्या शर्यतीच्या अंतिम फेरीत जेव्हा भारताचा सर्वात वेगवान अडथळा धावपटू तेजस शिर्से ट्रॅकवर उतरला, तेंव्हा त्याच्या खांद्यावर केवळ देशाच्या आशांचेच ओझे नव्हते तर त्याच्या डाव्या पायात दोन स्ट्रेस फ्रॅक्चर्सचे ओझेही होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 110 मी. अडथळ्याच्या शर्यतीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू बनल्यानंतर काही दिवसांतच, या 24 वर्षीय खेळाडूने खुलासा केला आहे की, त्याच्या या धैर्याच्या कामगिरीची त्याला मोठी किंमत मोजावी लागली आहे. या दुखापतीमुळे त्याचा 2026 चा हंगाम संपला आहे आणि पुढील महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याचे त्याचे स्वप्नही भंगले आहे.

डाव्या पायात घट्ट पट्टी बांधून धावताना, वेदना सहन करत शिर्से अंतिम फेरीत 15.39 सेकंदांच्या वेळेसह आठव्या स्थानावर राहिला. पदकाच्या शर्यतीत त्याला पोहोचवणारी 13.76 सेकंदांची वेळ आणि ही अंतिम फेरीतील वेळ यात खूप मोठा फरक होता.

Advertisement

एक भावूक खुलासा

ही पोस्ट लिहिण्याचे स्वप्न मी पाहिले नव्हते. मला वाटले होते की माझ्या हातात पदक असेल. विजयासाठी मी सज्ज झालो होतो. पण त्याऐवजी माझ्या हातात एमआरआय रिपोर्ट्स आहेत, असे शिर्सेने इन्स्टाग्रामवरील एका भावूक पोस्टमध्ये लिहिले. माझ्या डाव्या पायात दोन स्ट्रेस फ्रॅक्चर्स आहेत. एक स्वप्न काही काळासाठी थांबले आहे. एक हंगाम संपला आहे.

या निदानामुळे 19 सप्टेंबरपासून जपानमध्ये सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत स्प्रिंट हर्डल्समधील भारताच्या पदकाच्या प्रमुख आशांपैकी एक खेळाडू सहभागी होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे केवळ एक शर्यत हुकणे नव्हे तर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरुनही आता त्या स्टार्ट लाईनवर पुन्हा उभे राहता येणार नाही, याची जाणीव होणे, ही आहे. माझी चूक नसेल तर मी आतापर्यंत एकूण 9 मोठ्या स्पर्धांना मुकलो आहे. आज माझ्याकडे पुनरागमनाची कोणतीही कथा नाही. माझ्याकडे केवळ वेदना, प्रश्न आणि काही निर्णयांबद्दलची खंत आहे. जे निर्णय मी कदाचित वेगळ्या प्रकारे घेऊ शकलो असतो आणि असे भविष्य आहे जे मला आठवड्याभरापूर्वी जितके स्पष्ट दिसत होते, तितके आता दिसत नाहीये. या अध्यायानंतर मी नक्की कोण असेन, हे समजल्यावरच मी पुन्हा परत येईन, असे त्याने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.