Satara News | काळेश्वरी घाटात जखमी बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड; सातारा-केळवली रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत
कास - सातारा–नित्रळ–केळवली रोडवरील काळेश्वरी घाटात शुक्रवारी सकाळी साडे दहा आकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत एक जखमी व घायाळ बिबट्या आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच रस्त्यावरून जाणारे वाहनधारक व नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
जखमी अवस्थेतील बिबट्या रस्त्यालगत पडून असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी मोबाईलवर व्हिडिओ व छायाचित्रे काढण्यासाठी गर्दी केल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून बिबट्याच्या बचावासाठी आवश्यक हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. बिबट्या कशामुळे जखमी झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
वाहनाची धडक, अन्य वन्य प्राण्याशी झालेली झुंज किंवा इतर कारणांचा तपास वनविभागाकडून केला जाणार आहे.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, अशा वेळी नागरिकांनी जखमी वन्य प्राण्याजवळ जाणे, त्याला डिवचणे किंवा गर्दी करणे टाळावे. त्यामुळे प्राणी अधिक आक्रमक होऊ शकतो तसेच त्याच्या बचावकार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.
दरम्यान, सातारा परिसरातील घाटरस्त्यांवर वन्य प्राण्यांचा वाढता वावर आणि अपघातांच्या घटना लक्षात घेता वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.