वृक्ष संवर्धनासाठी 'से-ट्रीज'च्या टीमचा पुढाकार
औध :
से-ट्रीज संस्थेच्या माध्यमातून खटाव, माण, कोरेगाव तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना फळझाडांची लागवड करण्यासाठी झाडांचे वितरण करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना केवळ झाडे पुरवली जात नाहीत, तर त्या झाडांची योग्य लागवड, देखभाल आणि संवर्धन याविषयी आवश्यक प्रशिक्षण देखील दिले जाते. सद्यस्थितीत संस्थेची टीम गावोगावी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सखोल मार्गदर्शन करीत आहे.
खटाव तालुक्यातील वाडीवस्ती धरून ११० गावे, माण तालुक्यातील ५५ तर कोरेगाव तालुक्यातील ३० गावांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन वाटप करण्यात आलेली फळझाडे दोन ते तीन वर्षांची झाली असून झाडांचे संवर्धन करताना शेतकऱ्यांना काही अडचणी येत असल्यामुळे तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव छाटणी कशी करायची याची योग्य माहिती नसते. ही माहिती देण्यासाठी संस्थेची टीम शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बोडौं पेस्ट कशी बनवायची, झाडाला उत्पादन वाढवण्यासाठी योग्य छाटणी कशा पद्धतीने केली पाहिजे याचे मार्गदर्शन करीत आहे. संस्थेच्या या वृक्ष संवर्धनाच्या कामाला शेतकऱ्यांचा भरपूर प्रतिसाद आहे. भविष्यात यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन सुद्धा वाढेल. पर्यावरणाचा समतोलही राहील. मातीची सुपीकता वाढवण्यासाठी नैसर्गिक खतांचा वापर कसा करावा, झाडांना प्राण्यांच्या हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना जसे की झाडाभोवती संरक्षण जाळी बसवणे किंवा नैसर्गिक उपाय वापरणे याचेही मार्गदर्शन केले जात आहे
- उत्पादनवाढीची खात्री
से-ट्रीज टीमने वेळोवेळी शेतात येऊन झाडांची छाटणी, बोर्डो पेस्ट तयार करणे, कीड व रोग नियंत्रण याविषयी दिलेल्या मार्गदर्शनामुळे फळझाडांची वाढ लक्षणीयरीत्या सुधारली आहे. या मार्गदर्शनामुळे उत्पादन वाढण्याची खात्री आहे.
- नाथा सुतार शेतकरी, गोपूज