चिकोडी जिल्ह्यासाठी पुढाकार महत्त्वाचा
पंचमशिवलिंगेश्वर स्वामीजी यांचे मत : सीमाभागातील सर्व स्वामीजींचा जिल्हा मागणीसाठी पाठिंबा
प्रतिनिधी/ चिकोडी
चिकोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री यांच्याकडे शिष्टमंडळ नेण्याची तयारी दर्शविल्यास निडसोसी सिद्धसंस्थान मठाच्या माध्यमातून चिकोडी विभागातील सर्व स्वामीजी व धर्मगुरु शिष्टमंडळात सहभागी होतील, असे मत पंचमलिंगेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केले. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात चिकोडी जिल्हा कृती समिती, चिकोडी आणि विविध संघटनांच्यावतीने आयोजित केलेल्या चिकोडी जिल्हा मागणीसाठीच्या कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, सीमाभागातील सर्व स्वामीजींनी या जिल्हा मागणीसाठीच्या लढ्याला यापूर्वीच पाठिंबा दर्शविला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींसह जिल्हा पालकमंत्र्यांनी वेळ निश्चित करावी. जनतेच्या हितासाठी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली.
चिकोडी चरमूर्ती मठाचे संपादना स्वामीजी म्हणाले, या भागातील सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आल्यास मी चिकोडी जिल्हा होण्यासाठी पुढाकार घेण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री यांनी यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे आता या भागातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. बसवबेळवी चरंतेश्वर मठाचे शरणबसव देव म्हणाले, बेळगावला उत्तर कर्नाटकाची राजधानी होण्याची क्षमता आहे. त्यामुळे चिकोडी जिल्हा झालाच पाहिजे, असे सांगितले.
प्रा. एस. वाय. हंजी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व आमदारांनी चिकोडी जिल्ह्यासाठी या भागातील आमदारांना एकमुखाने पाठिंबा दिला आहे. जर आपण जिल्हा करून घेतला नाही तर पुढील पिढीला खूप त्रास सहन करावा लागेल. 31 डिसेंबरपूर्वी चिकोडी जिल्हा न झाल्यास पुन्हा 5 वर्षांसाठी वाट पाहावी लागेल, असे सांगितले. दरम्यान, जोडकुरळी सिद्धारुढ मठाचे चिद्घानंद स्वामीजी यांनी मत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमात बेल्लद बागेवाडी विरक्तमठाचे शिवानंद स्वामीजी, भेंडवाड रेवणसिद्धेश्वर मठाचे गुरुसिद्ध स्वामीजी, आडी सिद्धेश्वर मठाचे सिद्धेश्वर स्वामीजी, कमतनेट्टी प्रभू लिंगेश्वर मठाचे गुरुदेव देव, निपाणी मुरुघेंद्र मठाचे मल्लिकार्जुन स्वामीजी, डोणवाड दुरदुंडेश्वर मठाचे शिवानंद महास्वामीजी, खडकलाट कुमारेश्वर मठाचे शिवबसव महास्वामीजी, कब्बूर गौरीशंकर मठाचे रेवणसिद्धेश्वर स्वामीजी तसेच रुद्राप्पा संगप्पागोळ, सुरेश ब्याकूड, त्यागराज कदम, नागेश माळी आदी उपस्थित होते. रामकृष्ण पानगुडे यांनी सूत्रसंचालन केले.