For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वनजमीन हक्कासंबंधीच्या दाव्यांच्या अर्ज प्रक्रियेला प्रारंभ

10:23 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
वनजमीन हक्कासंबंधीच्या दाव्यांच्या अर्ज प्रक्रियेला प्रारंभ
Advertisement

खानापूर तालुका अरण्य हक्क संघर्ष समितीचे एकदिवसीय शिबिर, मान्यवरांकडून मार्गदर्शन

Advertisement

खानापूर : अतिक्रमित वनजमिनीवरील हक्कासंबंधीच्या दाव्यांचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. याची माहिती देण्यासंदर्भात मान्यवरांच्या उपस्थितीत खानापूर तालुका अरण्य हक्क संघर्ष समितीचे एकदिवसीय शिबिर खानापूर येथे पार पडले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपतराव देसाई, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वंचितता विभागाचे प्रा. अविनाश भाले, शिवाजी विद्यापीठाच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभागाचे संचालक तथा डीन डॉ. श्रीकृष्ण एस. महाजन यांची विशेष उपस्थिती लाभली. अनुसुचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारित नियम 2012 मध्ये नमूद असलेले हक्काधिकार वन निवासी लोकांना मिळवून देण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीच्या महादेव मरगाळे यांच्या निमंत्रणावरून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संपतराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर पार पडले. वनहक्क संघर्ष समितीचे सचिव अभिजित सरदेसाई यांनी प्रास्ताविक केले.

शिवाजी विद्यापीठाकडून सहकार्य

Advertisement

यावेळी प्रा. अविनाश भाले म्हणाले की, वनहक्काचे दावे तयार करत असताना दावेदारांनी विशेष काळजी घेण्याची नितांत गरज आहे. दावे बनवताना थोडा जरी निष्काळजीपणा केला तर संपूर्ण दावा अमान्य केला जाऊ शकतो. त्यामुळे योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यानिशी दावे बनवताना दक्षता घेणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभागाचे डीन डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले की, शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबवते. त्याची व्याप्ती वाढत जाऊन आता सीमाभागातही म्हणजे बेळगाव जिह्यातसुद्धा त्यांचे कार्य प्रसृत होऊन ते खानापुरात कार्यरत आहेत, हे विशेष आहे. विद्यापीठाच्या लोकांकडून जे सहकार्य दिले गेले त्याबद्दल समाधान व्यक्त करत डॉ. महाजन म्हणाले की, आपण स्वत:देखील शिवाजी विद्यापीठाकडून जे कांही सहकार्य देता येईल ते सहकार्य भविष्यातही मिळवून देण्याचा प्रयत्न करू. पुढे आपल्या भाषणात त्यांनी वैयक्तिक तथा सामुदायिक वनहक्कांच्या अनुषंगाने आपले मत मांडले.

शिबिराचे निमंत्रक महादेव मरगाळे यांनी आभार मानले. अभिजित सरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. शिबिराच्या दुसऱ्या सत्रात विविध गावच्या लोकांचे दावे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. यावेळी दाव्यांचे अर्ज विहित नमुण्यात भरण्यासाठी तसेच दावेदारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी संपतराव देसाई, युवराज जाधव, बाळासाहेब जाधव, अविनाश भाले, डॉ. किशोर, घटुकडे, महादेव मरगाळे, अभिजित सरदेसाई इत्यादिंनी मदत केली. शिबिरात बाकनूर, शिरोली, हुळंद, तिवोली, तळावडे, जांबोटी, कारलगा, माडी गुंजी, करंजाळ, असोगा, देगाव, कामतगा, वाटरे, घोसे, इ. गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रकाश गुरव, मोहन घाडी इत्यादींनी विशेष प्रयत्न केले.

उपविभागीय - प्रांतिय समितीकडे दावा न्यावा लागेल!

संपतराव देसाई म्हणाले, वनहक्क संपादित करण्यासाठी आपल्याला संघटित लढा द्यावा लागेल. संघ शक्तीमुळेच प्रशासनाला जाग येणार आहे. तेव्हा आपण निर्धाराने लढले पाहिजे. कायदा हेच आपले शस्त्र आहे. अरण्य हक्काच्या दाव्यासाठी अर्ज तयार झाले की ते मान्य करून घेण्याची प्रक्रिया हाती घ्यावी लागणार आहे व त्यासाठी उपविभागीय वा प्रांतिय समितीकडे दावा न्यावा लागेल. तेव्हा हा लढा केवळ अर्ज दिला की संपत नसून, सुरू होतो, हे सगळ्dयांनी लक्षात ठेवले पाहिजे.

Advertisement
Tags :

.